अयोध्यानगरीत मंत्रोच्चाराने राम दरबाराची प्राणप्रतिष्ठा
‘जय श्रीराम’च्या घोषाने परिसर दुमदुमला
वृत्तसंस्था/अयोध्या
अयोध्येत राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावर बांधलेल्या राम दरबाराची प्राणप्रतिष्ठा गुरुवारी पूर्ण विधींसह संपन्न झाली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी राम दरबाराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी खास आमंत्रित केलेल्या 101 शंकराचार्यांसह राम दरबाराची प्राणप्रतिष्ठा केली. या सोहळ्यादरम्यान मंदिर परिसर ‘जय श्रीराम’च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.
राम दरबाराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सकाळी 11.25 ते 11.40 दरम्यान पार पडला. मुख्य राम दरबाराव्यतिरिक्त राम मंदिर संकुलातील इतर आठ मंदिरांनाही अभिषेक करण्यात आला. हा सोहळा पूर्ण धार्मिक विधी आणि वैदिक मंत्रांनी पार पडल्याचे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे विश्वस्त अनिल मिश्रा यांनी सांगितले. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्येत पोहोचले होते. येथे ते प्रथम हनुमानगढी येथे गेले आणि पूजा केली. त्यानंतर राम मंदिरात पोहोचून त्यांनी रामलल्लाची पूजा केली.
गंगा दशहराच्या शुभप्रसंगी गुरुवारी अयोध्येत राम दरबार आणि गर्भगृहाच्या चारही बाजूंना बांधलेल्या इतर मंदिरांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला प्रारंभ झाला आहे. प्राणप्रतिष्ठेसाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह पाचशेहून अधिक विशेष पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते. हिंदू धार्मिक शास्त्रांनुसार, गंगा दशहरा हा पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी राजा भगीरथाच्या तपश्चर्येने प्रेरित होऊन पवित्र नदी गंगा भगवान शिवाच्या कुंडातून पृथ्वीवर अवतरली. म्हणूनच हिंदू धर्मात हा दिवस खूप खास मानला जातो.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर राम दरबाराच्या प्राणप्रतिष्ठेबद्दल आनंद व्यक्त केला. ‘आज अयोध्या धाममधील श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या पहिल्या मजल्यावर श्रीराम दरबारासह आठ मंदिरांमधील देवतांच्या पवित्र मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठेसाठी आयोजित कार्यक्रमाचे साक्षीदार होणे ही एक मोठी पर्वणी आहे. हा शुभ प्रसंग ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ची एक नवीन अभिव्यक्ती आहे. जय सियावर श्री रामचंद्र!’ असे ट्विट त्यांनी केले.
अयोध्येतील नवनिर्मित मंदिर संकुलात रामलल्लाच्या मूर्तीचा पहिला अभिषेक समारंभ मागील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झाला होता. 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत एका भव्य कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी स्वत: रामलल्लाच्या मूर्तीवर अभिषेक केला होता. या सोहळा देश-विदेशातील अनेक नामांकितांच्या उपस्थितीत पार पडला होता. गेल्या दीड वर्षात कोट्यावधी भाविकांनी रामलल्लाचे दर्शन घेतले आहे.