वाचे आळवावा पांडुरंग
मीरा उत्पात-ताशी :
अवघ्या विश्वाला वेड लावणाऱ्या श्री विठ्ठलाची जादू सर्वस्पर्शी आहे. त्याने केवळ लहान थोर उच्च नीच हेच भेद नाही तर धर्मपंथ जात हे भेद ही मिटवले.
या लागी पापयोनीही अर्जुना।
का वैश्य शूद्र अंगना।
मातें भजता सदना।
माझिये येती।
असे ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत सांगतात. जे भगवान श्रीकृष्णांनी आपल्या मुखातून सांगितले आहे. ज्ञानेश्वरांनी स्थापन केलेल्या भागवत धर्माने सामाजिक विषमता मिटवण्याचा प्रयत्न केला आहे. एवढेच नाही तर जातीव्यवस्था भेदून परधर्मालाही विठ्ठलभक्तीत सामावून घेतले आहे. चोखामेळा, नामदेव, सावता माळी, नरहरी सोनार आदी अठरापगड जाती धर्माच्या संतांबरोबरच अनेक मुस्लिम धर्मीय संतही होऊन गेले आहेत. शहामुंतोजी, अलम खान, हुसेन अंबरखान, शेख सुलतान शहामुनी, शेख महंमद, लतीफ शहा, सय्यद हुसेन, वाजिद पठाण, शहा बेग, हुसेन फकीर ही त्यातील काही नावे आहेत. अजूनही बरीच नावे अज्ञात आहेत. या मुसलमान संतांपैकी एक नाव म्हणजे शहामुंतोजी. याला ‘मृत्युंजय‘ ‘शहा मंहम्मद ब्राह्मणी’ अशा नावाने सुद्धा ओळखले जाते. तो बिदरचा राज्यकर्ता होता म्हणून त्याला ‘बेदरीचा बहामनी बादशहा’ असे सुद्धा म्हणतात. शहा मुन्तोजीचा जन्म बिदरच्या बहामनी घराण्यात झाला होता. राजवैभवाचा त्याग करून तो विठ्ठल भक्तीत रममाण होण्यास एक घटना कारणीभूत ठरली. शहा मुंतोजी आपल्या राजवाड्यात राजसौंधावर पत्नीसह केळी खात बसला होता. त्याने केळी खाऊन टाकलेल्या साली खाली उभे राहून एक भिकारी खात होता. राजवाड्यात राजाज्ञेशिवाय यायला बंदी असताना एका भिकाऱ्याने तिथे प्रवेश करून मुंतोजीने टाकलेल्या केळीच्या साली खाण्याचे धाडस केले हे पाहून राजाला खूप राग आला.
भिकऱ्याला शासन करण्याची त्याने सेवकाला आज्ञा केली. राजसेवकांकडून लाथा बुक्क्याने मारहाण होताना सुद्धा भिकारी हसू लागला. या गोष्टीचे मुंतोजीला खूप नवल वाटले. त्याने त्याला हसण्याचे कारण विचारल्यावर तो भिकारी म्हणाला ‘मी फक्त साल खाल्ली तर मला एवढी शिक्षा झाली. मी इतक्या लाथा खाल्ल्या. तू तर एवढी केळी खाल्ली आहेस. आतला मगज खाल्ला आहेस. तुला तर किती शिक्षा होईल? अरे मी केवळ राजवाड्यात सहज डोकावलो, तर मला एवढे क्लेश मिळाले. तू तर कित्येक दिवस इथे वास्तव्य करतो आहेस. कसे व्हायचे तुझे? हे पाहून मला हसू आले. अरे न्याय पाहणारा, जगाचा नियंत्रण करणारा कोणीतरी आहे आणि तो हे सारे पाहतो आहे.’
या प्रसंगामुळे मुंतोजीस वैराग्य आले. तो राजवाड्या बाहेर पडला. योगायोगाने त्याला पंढरपूरला आषाढी यात्रेसाठी पायी जाणारी दिंडी दिसली. वारीचा हा सोहळा पाहून तो त्यात रंगून गेला. मग त्या दिंडी बरोबर पायी चालत तो पंढरपुरात पोहोचला. त्याने विठ्ठल मंदिराच्या दारात तीन दिवस धरणे धरल्यावर त्याच्या हाती ‘विवेक सिंधू’ या ग्रंथाची प्रत पडली. कल्याणीच्या सहजानंदांना गुरु करून घेण्याचा श्रीविठ्ठलाने स्वप्नात दृष्टांत दिला. विठ्ठलाच्या आदेशानुसार मुन्तोजीस सहजानंदांनी गुरु मंत्र दिला. त्याचे नाव ‘मृत्युंजय’ ठेवले. गुरूंनी त्याची अनेक प्रकाराने परीक्षा घेतली आणि तो गुरुच्या कसोटीला उतरला. मृत्युंजय उर्फ मुंतोजीनी वेद, उपनिषद, पुराण यावर अभ्यास करून त्यावर भाष्य लिहिले. त्याच्या नावावर सिद्धसंकेत प्रबंध, अमृतसार, अद्वैत प्रकाश, प्रकाशदीप, स्वरूप समाधान, अनुभवसार, गुरूलीला, विवेकोत्पत्ती, अनुभवामृत हे ग्रंथ आहेत. मृत्युंजयाची श्रीविठ्ठलावर अपार श्रद्धा होती. तोच सृष्टीचा निर्माता आहे आणि त्याच्या इच्छे शिवाय काहीच होत नाही असे सांगताना तो म्हणतो ‘त्यासी सृष्टीची इच्छा झाली। इच्छा शक्ती पासाव सर्वसृष्टी रचली।‘
ज्ञानेश्वरादि सतांनी गायलेला श्रीविठ्ठलाचा महिमा मृत्युंजयने आपल्या अभंगातून गायला. श्रीकृष्णाच्या बाललीलांचे वर्णन केले. केवळ मुसलमान संत कवी म्हणूनच नव्हे तर संतांच्या मांदियाळीत मानाचे स्थान मिळवणारा मृत्युंजय हा महायोगी होय!