तालुक्यात उदं गं आई उदं चा जयघोष...
भंडाऱ्याच्या उधळणीत विविध गावांमध्ये यल्लम्मा यात्रा उत्साहात : सामूहिक परडी भरण्याच्या कार्यक्रमाला भाविकांची अलोट गर्दी
वार्ताहर/किणये
भंडाऱ्याची उधळण पारंपरिक वाद्यांचा गजर आणि उदं गं आई उदं... च्या जयघोषात तालुक्यात मंगळवारी यल्लमादेवी यात्रा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडली. लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील यल्लमादेवी डोंगरावर शाकंभरी पौर्णिमेनिमित्त तालुक्याच्या विविध गावांतून भक्त मोठ्या संख्येने गेले होते. हे भक्त सोमवारी सायंकाळी आपापल्या गावी परतले असून मंगळवारी तालुक्याच्या विविध गावांमध्ये यल्लम्मा देवीची यात्रा साजरी करण्यात आली. मंगळवारी या यात्रेनिमित्त सामूहिक पद्धतीने परडी भरण्याचा कार्यक्रम पार पडला. यानिमित्त बहुतांशी ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दर्शनासाठी व परडी भरण्याच्या कार्यक्रमासाठी भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
मच्छेत ब्रम्हलिंग मंदिर आवारात परडी भरण्याचा कार्यक्रम
शाकंभरी पौर्णिमेनिमित्त दि. 1 जानेवारीपासून तालुक्याच्या विविध गावांतील भाविक बस, खासगी वाहने, टेम्पो आदींमधून सौंदत्ती डोंगरावर गेले होते. बहुतांशी गावातील नागरिकांनी शनिवार दि. 3 रोजी यल्लम्मा डोंगरावर परडी भरल्या. तीन-चार दिवस यल्लम्मा डोंगरावर या भाविकांनी वस्ती केली होती. त्यानंतर काही गावातील भाविक सोमवारी सायंकाळी गावाकडे दाखल झाले. तर काही ठिकाणी मंगळवारी पहाटेच्या दरम्यान भाविक दाखल झाले. गावांच्या बाहेर दरवर्षीप्रमाणे ठरलेल्या ठिकाणी विधिवत पूजाअर्चा करण्यात आली. या ठिकाणी परडी भरण्यात येत होत्या. भाविक अगदी मनोभावे येऊन या सोहळ्यात सहभागी झाले होते. मच्छे येथील ब्रह्मलिंग मंदिराच्या बाजूला मंगळवारी परडी भरण्यात आल्या. यावेळी देवस्थान पंचकमिटी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जे भक्त यल्लमा डोंगरावर गेले नव्हते त्यांनीसुद्धा या गावातील यात्रेमध्ये सहभाग दर्शविला होता.
सोनोली-बहाद्दरवाडीत भाविकांची गर्दी
सोनोली गावातील यात्रेला भक्तांची गर्दी अधिक प्रमाणात दिसून आली. सामूहिक पद्धतीने परडी भरण्याचा कार्यक्रम झाला. बहाद्दरवाडी विठलाई मंदिराकडे जाणाऱ्या रोडच्या बाजूला असलेल्या शिवारात यल्लम्मा देवीची यात्रा साजरी करण्यात आली. परडी भरल्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. याचबरोबर तालुक्याच्या विविध गावांमध्ये ही यात्रा उत्साहात साजरी करण्यात आली.
कडोली येथील आमराईत मारग मळणे कार्यक्रम उत्साहात
देवस्थान पंचकमिटी, हक्कदार आणि भक्तांच्यावतीने कडोली येथे श्री रेणुका देवीच्या मारग मळणेचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. सालाबादप्रमाणे सौंदत्ती येथील श्री रेणुका देवीच्या यात्रेला जाऊन आलेल्या भक्तांच्यावतीने मंगळवारी सायंकाळी हा परडी भरण्याचा कार्यक्रम पार पडला. शनिवारी सौंदत्ती येथे कडोली ग्रामस्थांच्यावतीने देवीची परडी भरण्याचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर रविवारी आणि सोमवारी सर्व भक्त गावी परतत आहेत. या पार्श्वभूमीवर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष दीपक मरगाळे, उपाध्यक्ष सूर्याजी कुट्रे, हक्कदार आणि ग्राम पंचायतीने येथील यात्रेसंबंधी पूर्वतयारी केली. मंगळवारी अंगारकी संकष्टी असल्याने यात्रेला उशिरा सुरुवात करण्यात आली. सायंकाळी 5 वा. श्री देवस्थान पंचकमिटी आणि हक्कदारांच्यावतीने परडी भरल्यानंतर गाऱ्हाणा कार्यक्रम झाला. पूजेचा धार्मिक कार्यक्रम पार पडल्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला. यावेळी मोठ्या संख्येने भाविक देवीच्या गदगेसमोर जमले होते.