भावेश्वरी यात्रेत ‘चांगभलं’चा गजर
मोदगे येथे भक्तिमय वातावरण : लाखो भाविकांनी घेतले दर्शन
वार्ताहर/दड्डी
‘चांगभलं’च्या गजरात भावकाई देवीच्या यात्रा महोत्सवाला भक्तिपूर्ण वातावरणात सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी सुमारे 6 हजार भाविकांनी शस्त्र इंगळीचा लाभ घेतला. सोमवारी सकाळपासूनच देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी झाली होती. मंगळवारी सुमारे 2 लाख भाविकांनी देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला. बेळगाव, कोकण महाराष्ट्र व गोवा, येथून भाविक मोदगा गावात दाखल होत आहेत. गावानजीकची शेतवाडी भाविकांनी भरून गेली आहे. मंदिर परिसरात भाविक रांगेत थांबून दर्शन घेत आहेत. देवीच्या नावानं चांगभलंचा गजर व भंडाऱ्याची उधळण करीत देवीचे दर्शन घेतले जात आहे. त्यामुळे मंदिर परिसरात भंडाऱ्याचा खच पडला आहे. यंदा बकऱ्यांच्या दरात कमालीची तेजी पाहावयास मिळत असतानाही किमतीकडे लक्ष न देता त्यांच्या खरेदीसाठी भाविकांनी कोणतीच कसर ठेवली नाही.
मंदिर परिसरात विविध स्टॉलची गर्दी झाली आहे. तालुका प्रशासनाने यात्रा उत्साहात व शांततेत पार पाडण्यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. शुद्ध पाणी व 24 तास वीजपुरवठा केल्यामुळे यात्रेकरूंना सोयीचे झाले आहे. मंगळवारी दिवसभरात कोट्यावधी ऊपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे. भाविकांच्या आरोग्यासाठी खास वैद्यकीय सेवा उपलब्ध आहे. देवीचे दर्शन सुलभ होण्यासाठी भावकाई देवी पाटील ट्रस्ट कमिटी अध्यक्ष भाऊराव पाटील, सचिव संतराम पाटील, चंद्रकांत पाटील, सुधाकर पाटील, भागोजी पाटील, नंदकुमार पाटील, माऊती पाटील व अप्पा पाटील व श्री भावकाई देवी मंदिर परिसर विकास व यात्रा उत्सव कमिटी मोदगे (मुंबई) यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.