For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बदलते वर्ष, बदलते संदर्भ

06:04 AM Jan 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
बदलते वर्ष  बदलते संदर्भ
Advertisement

नवीन वर्ष कोणाला कसे जाणार? कोण तरणार? कोण मरणार? कोण मारणार? असे वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात असताना काँग्रेसअंतर्गत एका नव्या चर्चेला सुरुवात झालेली आहे. प्रियंका गांधी यांचा मुलगा राजकारणात पडणार काय? याबाबत उलटसुलट चर्चा राजधानीच्या राजकीय वर्तुळात ऐकू येत आहे. 25 वर्षाचा रेहान गांधी वड्रा हा एक व्यावसायिक फोटोग्राफर आहे. दिल्लीतील एका मुलीशी त्याचा नुकताच साखरपुडा झाला. त्यामुळे गांधी घराण्याचा तो पुढील वारसदार असणार काय? अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले नसते तरच नवल होते.

Advertisement

राहुल गांधी हे 55 वर्षाचे झाले असले तरी त्यांनी लग्न न केल्याने त्यांचा भाचाच पुढील पिढीचा राजकीय मार्गदर्शक ठरेल काय? या प्रश्नाचे उत्तर काळाच्या उदरात दडलेले आहे. स्वत: रेहन आपण राजकारणात उतरण्याविषयी विचार केलेला नाही असे सांगत आहेत. त्याचा अर्थ उद्या काहीही घडू शकते.

निवडणूकांत होत असलेल्या सतत पराभवाने काँग्रेसने काय धडा घेतला पाहिजे आणि आपल्याला कसे बदलवले पाहिजे, याबाबत उपदेश अथवा सल्ला देणाऱ्यांची अजिबात कमतरता नाही. प्रत्येकजण आपापल्यापरीने तो देत असतो. काँग्रेसविषयी द्वेष बाळगणारे तर तो पक्ष जेव्हढा लवकर संपेल तेव्हढे चांगले असे सांगत ताबडतोब आंघोळ करायला तयार असतात. भाजपच्या नेतृत्वाने तर काँग्रेसमुक्त भारताची जणू मोहीमच सुरु केलेली आहे. अशावेळी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत दिग्विजय सिंग यांच्यासारख्या जुन्या नेत्याने भाजप आणि संघाच्या संघटना कौशल्यावर कौतुकाचे सडे टाकून आपली जबाबदारी पूर्ण केली. स्वत:ला संघ आणि भाजप विरोधी भासवणाऱ्या सिंग यांनी वेळोवेळी वादग्रस्त विधाने करून काँग्रेसचेच नुकसान केलेले आहे, ते गेल्या दोन दशकात दिसलेले आहे. स्वत:च्या गृहराज्य मध्यप्रदेशमध्ये भाजपला गेली वीस वर्षे त्यांनी मोकळे रान दिलेले आहे. ते इतके की 4-5 वर्षांपूर्वी त्यांना बऱ्याच परिश्रमाने आणलेले सरकार देखील सांभाळता आले नाही. त्याकाळचे मुख्यमंत्री कमलनाथ हे स्वत:च भाजपमध्ये जायला निघाले होते. अचानक भाजपनेच दरवाजा बंद केला म्हणून ते तोंडावर आपटले आणि तेव्हापासून तोंड लपवून फिरत आहेत.

Advertisement

कावळ्याच्या शापाने जशी गाय मरत नाही तद्वतच दिग्विजय यांच्या विधानांमुळे काँग्रेस संपणार नाही, असे निष्ठावंत सांगतात. 80 वर्षाचे झालेल्या दिग्विजय यांचे दु:ख असे की पक्षाचे नेतृत्व त्यांना विचारत नाही. त्यांना कार्यकारिणीमध्ये घेतले गेले असले तरी त्यांना ‘पडे रहो मुन्नाभाई’ या न्यायाने दुर्लक्ष केले जात आहे. पक्षात राहुल गांधी सक्रिय झाल्यापासून भलेभले नेते पैदल झालेले आहेत तर गुलाम नबी आझाद यांच्यासारखे पक्ष सोडून गेलेले आहेत. राहुल यांचे रागलोभ प्रचंड असल्याने त्यांच्या मर्जीतील नेतेमंडळीच पुढे येताना दिसतात. राहुल यांच्या अतिजवळचे समजले जाणारे के सी वेणुगोपाल हे सगळ्यांच्या मनात मिसळतात.

85 वर्षांचे मल्लिकार्जुन खर्गे हे अध्यक्ष असले तरी दैनंदिन बाबतीत वेणुगोपाल म्हणतील ती पक्षाकरता पूर्व दिशा असते. गेल्या लोकसभेत काँग्रेसचे नेते असलेले बंगालचे अधीर रंजन चौधरी हे देखील भाजपच्या मार्गावर आहेत अशी चर्चा गेल्या आठवड्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर बोलली जात आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या अधीरबाबूंचे गेल्या लोकसभेत पानिपत झाले होते. तेव्हापासून ममतांना सत्तेतून खाली खेचण्याची त्यांनी जणू शपथच घेतली होती. अशावेळी भाजप हाच तृणमूल काँग्रेसचा खरा प्रतिस्पर्धी म्हणून उदयाला आल्याने या वर्षीच्या विधानसभा निवडणूकीपूर्वी अधीरबाबूंना भाजप जणू खुणावत आहे.

ममतांना खाली खेचण्यासाठी भाजपने कंबर कसलेली आहे. त्यामुळे यावेळची लढत ही अतिशय चुरशीची होणार आहे, ममता केवळ मुस्लिमधार्जिण्या आहेत, या एका मुद्यावर भाजपला निवडणूक फिरवावयाची आहे. महिलावर्गाचा देखील ममतांना जबर पाठिंबा आहे हे देखील विसरून चालणार नाही. ममता या वाघीण आहेत. त्या आयत्यावेळेला अजून काय मुद्दा काढणार ते अनाकलनीय आहे. केंद्राने बंगालला सापत्नभावाची कशी वागणूक देणे चालवले आहे, याबाबत देखील त्या आक्रमक आहेत.

गमतीची गोष्ट अशी की गेल्या आठवड्यात गृहमंत्री अमित शाह यांनी 40-45 वर्षांपूर्वी बंगालमध्ये जेव्हा गैरतृणमूल आणि गैरकम्युनिस्ट पक्षाचे राज्य होते तेव्हा तेथील दरडोई उत्पन्न हे अखिल भारतीय दरडोई उत्पन्नापेक्षा 27 टक्के जास्त होते, असे सांगून एकप्रकारे तेथील पूर्वीच्या काँग्रेस सरकारांचे कौतुकच केले. या वर्षी केरळमध्ये देखील विधानसभा निवडणूका होणार आहेत. तिथे वेगळेच राजकारण सुरु आहे. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस प्रणित संयुक्त लोकशाही आघाडीने बाजी मारल्यापासून मार्क्सवादी मुख्यमंत्री पिनारायी विजयन आणि त्यांचे समर्थकांनी काँग्रेसविरुद्ध जणू आघाडीच उघडलेली आहे. काँग्रेसला जिथे तिथे पाण्यात पाहण्याचे राजकारण राज्यातील डाव्यांनी सुरु केले आहे. विजयन गेली दहा वर्षे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या सरकारविरुद्ध लोकभावना वाढत आहेत.

‘अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात सामील होऊन मनमोहन सिंग सरकारविरुद्ध आपण जी मोहीम छेडली त्याचे जे दुष्परिणाम देशावर झाले त्याबाबत आपण जाहीर माफी मागतो’, असे गेल्या आठवड्यात अरविंद केजरीवाल यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून लढलेल्या प्रशांत भूषण यांनी जाहीर करून एका वेगळ्याच चर्चेला तोंड फोडले आहे.

ख्यातनाम वकील असलेले भूषण हे गेल्या दशकभरात मोदी सरकारचे एक प्रमुख विरोधक म्हणून उदयाला आलेले आहेत. न्यायसंस्थेच्या कामात किती ढळढळीतपणे सध्या ढवळाढवळ केली जात आहे, असे त्यांचे नेहमीच आरोप राहिलेले आहेत. त्यांनी कधीकधी बरेच स्फोटक दावे देखील केलेले आहेत पण त्यांच्याविरूद्ध कोणतीही कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही. उत्तरप्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे विरोधक पंकज चौधरी हे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून राज्यातील योगी विरोधकांना चेव आलेला आहे, असे दिसत आहे.

उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी नुकत्याच केलेल्या एका जिह्याच्या दौऱ्यात तेथील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने एका योगी भक्ताच्या रूपाने चालवलेल्या कामाची जाहीर निंदा केली. एव्हढेच नव्हे तर तुम्ही वेळीच बदलला नाहीत तर तुम्हाला फार कठीण जाईल, अशी जाहीर धमकी दिली. या महिन्यात जर अमेरिकेशी व्यापार करार झाला नाही तर त्याचा अर्थ

वॉशिंग्टनने भारतविरोधी भूमिका घेण्याचे धोरण स्वीकारलेले आहे आणि त्याला तोंड देण्यासाठी देशाने कंबर कसली पाहिजे, असे जाणकार सांगत आहेत.

मोदी सरकार आणि त्याच्या पूर्वीच्या दोन-तीन दशकातील सरकारांनी अमेरिका धार्जिणे धोरण स्वीकारून देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला अद्दल घडवण्याचे धोरण स्वीकारून त्याला खिंडीत पकडलेले आहे, असे ते दावा करत आहेत. अशा नाजूक क्षणी भारत-पाक युद्ध थांबवण्यासाठी आपणदेखील मध्यस्थी केली होती, असे चीनने सांगून आंतरराष्ट्रीय जगतात भारत एकटा पडलेला आहे असे चित्र निर्माण केलेले आहे. चीन आणि अमेरिकेच्या वाढत्या गुळपीठाने आर्थिकदृष्ट्या सबळ असलेला युरोप तसेच जपान देखील अडचणीत आलेले आहेत. यावरून भारताची स्थिती कशी असेल याची कल्पना करता येते.

सुनील गाताडे

Advertisement
Tags :

.