गुंतवणुकीचे बदलते क्षितिज
सोने आणि चांदी यांच्या दराचे उच्चांक हे भविष्य काळातील आर्थिक परिस्थिती अधिक आव्हानात्मक आणि बिकट होत जाण्याचे संकेत मानले जातात. भूराजकीय अनिश्चितता डॉलर कमकुवत होण्याची शक्यता तसेच जागतिक विकास दर मंदावण्याची शक्यता यातून 2026 हे वर्ष आर्थिक लाभाचे असण्याची शक्यता कमी करते. या पार्श्वभूमीवर भारताने केलेल्या महत्त्वाच्या आर्थिक बदलाच्या पार्श्वभूमीवर तसेच ब्लॅक रॉकचे संचालक लॅरी फ्लिंट यांनी दिलेला महत्त्वाचा संदेश लक्षात घेतल्यास आपण आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर निश्चितपणे महत्त्वाचे बदल करू शकतो.
भारताने जागतिक स्तरावर राष्ट्रीय उत्पन्नाच्या निकषावर चौथा क्रमांक प्राप्त केला असून आगामी वर्षात विकासाचा दर 7.4 टक्के असण्याची शक्यता व्यक्त केली जाते. याचबरोबर आयकर 12 लाखापर्यंत मुक्तता आणि जीएसटी दरातील बदल तसेच व्याजदर कमी केल्याने ग्राहक मागणी समाधानकारक राहण्याची शक्यता निर्माण होते. हे सर्व विकासाला पूरक व पोषक ठरते. विकसित भारताचे स्वप्न 2047 पर्यंत साकार करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर जसे प्रयत्न होतात तसेच वैयक्तिक स्तरावर देखील आपण या बदलामध्ये सहभागी होणे आवश्यक आहे. केवळ साक्षीदार होऊन चालणार नाही. यासाठी गुंतवणुकीचे काही महत्त्वाचे बदल लक्षात घेणे आवश्यक आहे.
भांडवल बाजार हा आर्थिक लोकशाहीचा मार्ग असून त्यामध्ये प्रत्येकाला सहभाग घेता येतो. मात्र हा सहभाग ऐच्छिक असल्याने व त्याबद्दल असणारे गैरसमज यामुळे फार कमी लोक यात सहभागी होतात. अमेरिकेत 60 टक्के लोक भांडवल बाजारात असून भारतात हे प्रमाण अत्यल्प केवळ 7 टक्के इतकेच आहे. भांडवल बाजार संपत्ती निर्माण करणारे मोठे यंत्र आहे. परंतु मंदी, अनिश्चितता यातून अनेकवेळा भीतीने भांडवल बाजारातून बाहेर पडणारे अनेक गुंतवणूकदार आहेत.
2008 मध्ये 50 टक्के घटलेला भांडवल बाजार 2013 मध्ये पूर्ववत झाला तर 2020 मध्ये कोरोना काळात 34 टक्के घटलेला भांडवल बाजार फक्त पाच महिन्यात पूर्व पातळीवर आला. संपत्तीतील मालकी हा अत्यंत महत्त्वाचा घटक भांडवल बाजार मिळवून देतो. प्रत्येक देशात दोन प्रकारच्या अर्थव्यवस्था असतात. एक ज्यांच्याकडे संपत्तीवर संपत्ती वाढत जाते व दुसरे गरिबीवर गरीबी वाढवत असतात. पहिल्या गटातील लोक हे भांडवल बाजारात असतात तर दुसऱ्या गटातले नसतात एवढा सोपा हा मार्ग आहे.
गुंतवणुकीची पारंपारिक साधने जसे बँकेतील ठेवी, स्थावर मालमत्ता आणि शेअर बाजाराबाबत गैरसमज यातून नव्या संधी, नवे पर्याय याकडे जाणे आवश्यक आहे. सध्या म्युचअल फंडामार्फत दरमहा 31 हजार कोटी रुपये एसआयपी गुंतवणूक केली जाते, हे अत्यंत महत्त्वाचे ठरते. यातूनच असा नव गुंतवणूकदार विशेषत: तरुण गुंतवणूकदार बाजाराला मिळत असतो. यात अल्पकाळाचा विचार न करता दशकाचा विचार करून गुंतवणूक केली पाहिजे. यातूनच दीर्घकालीन भांडवल निर्मिती व संपत्ती वाढ घडू शकते. चक्रवाढ व्याज पद्धतीने होणारा फायदा हा दीर्घकाळातच असतो. त्यामुळे गुंतवणुकीच्या बाबतीत आपली आर्थिक उद्दिष्टे लक्षात घेऊन त्यानुसारच गुंतवणूक रचना ठरवणे क्रमप्राप्त व महत्त्वाचे ठरते.
दुसरे म्हणजे आपली गुंतवणूक केवळ एकाच क्षेत्रात असल्यास जोखीम वाढते. म्हणून गुंतवणूक ही विविध क्षेत्रात आणि विविध देशात देखील करण्याची आवश्यकता ठरते. नव्या वित्त तंत्राचा वापर करून आपण केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेरही गुंतवणूक करू शकतो. अर्थात अभ्यासपूर्वक व आपल्या जोखीम क्षमतेनुसार गुंतवणूक विविधता साध्य करणे योग्य ठरते.
गुंतवणुकीच्या परताव्याबाबत असणारे गैरसमज प्रथम बाजूला केले पाहिजेत. यासाठी खरा परतावा ही संकल्पना महत्त्वाची ठरते. बँकेतून मुदत ठेवीवर सात टक्के परतावा मिळतो. परंतु महागाई दर आठ टक्के असेल तर खरा परतावा वजा एक टक्का होतो. यातही पुन्हा मिळणाऱ्या परताव्यावर कर द्यावा लागत असेल तर हा परतावा आणखी कमी होतो. यासाठी महागाईपेक्षा अधिक परतावा देणारा व सुरक्षित असणारा पर्याय निवडणे आवश्यक असते. यासाठी थोडी जोखीम घ्यावी लागते. याबाबत पेन्शन फंडात केलेली गुंतवणूक जर आपण शेअर्समध्ये केली असेल तर गेल्या अकरा वर्षात त्यावर मिळालेला परतावा हा 11.4 टक्के होता. यातून भारतीय भांडवल बाजार दीर्घकाळात चांगला परतावा देतो हे सिद्ध होते.
भांडवल बाजारात रोख पैशाचे हस्तांतरण संपत्ती निर्माण करणाऱ्याकडे होत असते. हा मूलमंत्र लक्षात घेणे आवश्यक आहे. याचाच अर्थ आपण रोख रक्कम अधिक प्रमाणात ठेवत असू व संपत्ती निर्माण करणाऱ्या मालमत्ता घेत नसू तर आपण दीर्घकाळात गरीब राहण्याची प्रक्रिया स्वीकारत असतो.
शेअर बाजारातील गुंतवणुकीचा सोपा मार्ग म्हणून म्युचअल फंड काम करतात. या ठिकाणी देखील बाजाराची चढ-उतार होत असते. परंतु केवळ इतरांच्या सल्ल्याने अभ्यास न करता निवडलेले म्युचअल फंड देखील तेवढेच नुकसान करणारे ठरतात. यासाठी म्युच्युअल फंडाचे एकूण खर्च गुणोत्तर म्हणजेच टीईआर पाहणे महत्त्वाचे असते. ही त्यांची फी असते ही फी सक्रिय व्यवस्थापित म्युच्युअल फंडात अधिक असते तर निक्रिय व्यवस्थापित म्युच्युअल फंड ज्assग्न ल्हि् यावर कमी फी द्यावी लागते. दीर्घकाळात याचा मोठा परिणाम आपल्या एकूण गुंतवणूक फायद्यावर होतो. याबरोबर गुंतवणूक करताना आपल्या गुंतवणुकीचे मूल्यमापन आणि बाजारातील बदलते प्रवाह यांचा अभ्यासदेखील गरजेचा असतो.
भांडवल बाजारातील यश अथवा गुंतवणुकीतील उत्तम परतावा हा सातत्याने केलेला अभ्यास व योग्य निर्णय याचे फलित असतो. यासाठी बाजारावर लक्ष असणे आवश्यक असते. परंतु होणाऱ्या प्रत्येक घटनेमुळे अस्वस्थ होणे व सातत्याने आपल्या पोर्टफोलिओवरती लक्ष ठेवणे हे हानिकारक ठरते. आपला पोर्टफोलिओ हा महिन्यातून एकदा किंवा तीन महिन्यातून एकदा तपासणे युक्त असते. हे सर्व महत्त्वाचे मार्गदर्शक दीपस्तंभ आपणास आपले संक्रमण गरीबीतून श्रीमंतीकडे करण्यास निश्चितपणे उपयोगी ठरतील. दीर्घकालीन गुंतवणूक तसेच गुंतवणुकीतील विविधता ही जोखीम कमी करणारी ठरते.
प्रा. डॉ. विजय ककडे