खरेदीचे बदलते रुप : दारावरून दरवाजापर्यंत!
काळ बदलला आहे, आता सर्व काही ऑनलाइन मागवण्याचा जमाना आला आहे. कोणतीही वस्तु आता आपल्या दरवाजात काही मिनीटात हजर होते आहे. ऑनलाईन पद्धतीने कुणीही आपल्याला हवी ती चीज-वस्तू मागवू शकतो. विक्री-व्यवसाय संदर्भात हे एक मोठे परिवर्तन ठरले असून यातून फार मोठ्या प्रमाणात छोट्या मोठ्या स्वरुपातील व्यवसाय-विकासासह रोजगार संधींची दारे उघडली जात आहेत.
गेल्या दशकामध्ये ग्राहक आणि ग्राहकांची खरेदीबद्दलची पसंती-पद्धती व त्यावर आधारित व्यवसाय-विक्री आणि वितरण पद्धती इ. मध्ये आमुलाग्र बदल झालेला दिसून येतो. पूर्वी ग्राहक व त्यातही महिला या त्यांच्या परिसरात हातगाडी वा तत्सम वाहनांमधून हाकारे देत विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांकडून आवर्जून विविध वस्तू चोखंदळपणे खरेदी करीत असत. आता मात्र ऑनलाईन पद्धतीने कुणीही आपल्याला हवी ती चीज-वस्तू मागवू शकतो. विक्री-व्यवसाय संदर्भात हे एक मोठे परिवर्तन ठरले आहे. या ग्राहकाभिमुख व नव्या व्यवसाय पद्धतीची पार्श्वभूमी म्हणजे ‘स्वीगी’ने कोरोनाकाळात गुरुग्राम येथे 30 ते 45 मिनिटात ग्राहकाच्या थेट दारात सेवा देण्याच्या दृष्टीने ‘इंस्टामार्ट’ पद्धतीची केलेली सुरुवात. कोरोना काळातील काळजीचे व निर्बंधांसह व्यवहारांच्या पार्श्वभूमीवर जनसामान्यांसह ग्राहकांसाठी हा उपक्रम एक मोठा दिलासा ठरला.
त्यामुळे एकीकडे कोरोनाची गांभीर्यता व व्याप्ती वाढत असतानाच दुसरीकडे लोकांचा या घरपोच सेवा व्यवस्थेला मिळणारा प्रतिसाद वाढला नसता तरच नवल. हा मोठा व वाढता प्रतिसाद लक्षात घेता घरपोच वस्तू पुरविण्याचा कालावधी जवळ जवळ अर्ध्यावर म्हणजेच 15 ते 20 मिनिटांवर आणून मोठ्या उलाढालीसह या क्षेत्रात व्यवसाय वाढ करण्यात आली.
व्यवसायाला मिळणारी ग्राहकांची पसंती व वाढता प्रतिसाद पाहून घरपोच वस्तुसेवा पुरवठादार म्हणून ‘झेप्टो’ ची भर पडली. ‘झेप्टो’ ने तर केवळ 10 मिनिटात घरपोच सेवा ही नवी पद्धत सुरु केली व त्याला ग्राहकांची मोठी व वाढती पसंती मिळत गेली. योगायोग म्हणजे त्यावेळी कोरोनाची तुलनेने अधिक गंभीर लाट देशात पसरली होती. घरपोच सेवेची पद्धती जनसामान्यांच्या केवळ पसंतीसच पडली असे नव्हे तर ती त्यांच्या पचनी पडली होती व त्याचा फायदा ‘झेप्टो’ ला झाला.
त्या पाठोपाठ 2021 मध्ये ‘ब्लिंक-इट’ ची सुरुवात गुरुग्रामच्याच ग्रोफर्स या ‘स्टार्टअप’ कंपनीने केली व या व्यवसाय-व्यापार क्षेत्राला नवे वळण मिळाले. ग्रोफर्सने आपल्या व्यवसायाची सुरुवात मर्यादित स्वरुपात 2013 मध्ये केली होती व त्यांच्या गाठीशी तो अनुभव होताच. त्या पार्श्वभूमीवर ‘त्वरित सेवा’ या नव्या ब्रीद आणि धोरणासह ‘ब्लिंक इट’ने आपला व्यवसाय सुरु केला व एकूणच व्यवसायाला त्वरित नवी दिशा लाभली हे विशेष.
याचाच परिणाम म्हणून देशांतर्गत ग्राहकांना घरपोच सेवेचे विविध पर्याय उपलब्ध झाले. यातून ग्राहकोपयोगी व विशेषत: घरगुती स्वरुपातील नित्योपयोगी व महत्त्वाच्या वस्तुंचा व्यापार-पुरवठा करणाऱ्यांपासून या वस्तुंचे वितरण व पुरवठा करण्याचे काम करण्यासाठी संबंधित क्षेत्रात व्यवसाय वितरण, संकलन-वाहतूक अशा स्वरुपातील संधी उपलब्ध होत गेल्या हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे.
त्यानंतर घरपोच वस्तू सेवा पुरवठा क्षेत्रात सातत्याने प्रगतीसह वाढ होत गेली. या वस्तुंच्या पुरवठ्यामध्ये बदलता काळ आणि गरजांनुसार स्वयंपाकघरापासून घरातील दिवाणखान्यापर्यंत व कपड्यांपासून कलाकुसरीच्या वस्तूंपर्यंत आवश्यक वस्तू व पदार्थांचा समावेश करण्यात आला. यामुळे या नव्या व्यवसायाचे स्वरुप पुरतेपणी बदलले. या सेवा क्षेत्रातील कंपन्यांना त्यामुळे सुगीचे दिवस लाभले. वाढत्या मागणी व गरजांनुसार पुरवठा करण्यासाठी पूर्वतयारी मोठी लागते. या संबंधित व्यवसाय आणि व्यावसायिकांचा खरा कस त्यानिमित्ताने लागतो. उदाहरणार्थ विविध सणवार, पूजा प्रसंग वा राष्ट्रीय संदर्भातील नैमित्तीक व महत्त्वपूर्ण प्रसंगाच्यावेळी ठराविक व प्रासंगिकदृष्ट्या महत्त्वाच्या चीजवस्तुंची मागणी आणि खप यामध्ये मोठी मागणी वाढते. या वाढत्या मागणीचा नेमका व वस्तुनिष्ठ अंदाज येण्यासाठी आता अद्ययावत माहिती तंत्रज्ञानासह कृत्रिम बुद्धिमत्तेचा सुद्धा उपयोग केला जात आहे.
या नव्या व्यवसाय प्रक्रियेमध्ये ग्राहक म्हणून जनसामान्यांसाठी रोजच्या व आवश्यक अशा वस्तुंचा पुरेसा साठा विशिष्ट ठिकाणी केला जातो. या साठ्यासाठी जागा निवडतांना संबंधित वस्तुंची क्षेत्रनिहाय मागणी व सोयीस्कर जागा यावर विशेष भर दिला जातो. हे ठरविताना संबंधित ग्राहकाला 10 मिनिटात पुरवठा करण्याचे मोठे व्यावसायिक आव्हान पार पाडावे लागते.
यासंदर्भातील व्यवसाय-व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पूर्व-पिठिका म्हणजे ज्यावेळी एखादा ग्राहक त्याच्या गरजा व वस्तुंच्या संदर्भात झेप्टोशी ऑनलाईन संपर्क करतो. त्याची नोंद झेप्टोच्या ‘वेअरहाऊस
मॅनेजमेंट सिस्टिम’ पद्धतीद्वारा घेतली जाते. त्याठिकाणी अद्ययावत संगणकीय पद्धतीच्या आधारे ग्राहकाच्या गरजेनुसार संबंधित वस्तू पदार्थांची निवड करून त्याचे पॅकिंग करण्यात येते. त्याचे वितरण अचूक वेळेत व योग्य पद्धतीने होण्यासाठी उपलब्ध व वितरणाच्या दृष्टीने जवळच्या वाहक सेवेचा विचार केला जातो.वस्तुंचा पुरवठा करणाऱ्या वाहकाच्या त्वरित व अचूक माहिती आणि मार्गदर्शनासाठी वेअरहाऊस व डार्क स्टोर्स म्हणजेच विविध वस्तू आणि पदार्थांचा पुरेसा साठा ठेवून त्याद्वारे ग्राहकांना अचूक व वेळेत पुरवठा करण्यासाठी भर दिला जातो.
या संदर्भात ‘इंस्टामार्ट’ने स्पष्ट केल्यानुसार अधिकाधिक ग्राहकांना वेळेत व घरपोच सेवेकडे आकृष्ट करण्यासाठी विविध कंपन्या आपल्या व्यवसाय- विस्तारासाठी धडाडीने प्रयत्न करीत आहेत. ‘ब्लिंक इट’नेच गेल्या तिमाहीत 262 ‘डार्क स्टोर्स’ ची व्यावसायिक भर घातली आहे. त्यामुळे त्यांच्या एकूण स्टोर्सची संख्या सुमारे 1900 झाली आहे. कंपनीने 2025-26 मध्ये 2000 स्टोर्सचे व्यावसायिक उद्दिष्ट ठेवले होते. प्रत्यक्षात त्यांच्या स्टोर्सची संख्या 2100 वर जाण्याची शक्यता आहे हे विशेष. गेल्या काही वर्षात झालेल्या मोठ्या आणि महत्त्वाच्या व्यावसायिक बदलांमुळे कधी ‘ब्रेड-बटर’, ‘दूध-दही’, ‘फळे-भाजी’ या प्रकारच्या घरपोच पुरवठ्याच्यादृष्टीने सुरु करण्यात आलेल्या या व्यवसाय-साखळीद्वारे आता तर ‘सोप ते स्मार्टफोन’ असा व्यापक व मोठा व्यवसाय दृष्टीपथात येतो आहे. यामागे अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ‘सरासरी विक्री किंमत’ हे तत्व ग्राहकांसाठी लागू करण्यात येत आहे. या क्षेत्रात सल्लागार म्हणून काम करणाऱ्या किर्ने कंपनीचे संचालक अंकुर सिंह यांच्यानुसार सद्यस्थितीत ग्राहकाला त्यांच्या आवडीचा व पसंतीच्या ब्रँड कंपनीचा शर्ट हवा असेल तर त्यांना कुठल्याही दुकान-शोरुममध्ये न जाता पण नेमका तसा शर्ट निर्धारित कालावधीत त्याच्या घरी पोचता करण्याची क्षमता या व्यवसाय प्रक्रियेने सिद्ध केली असून त्याला उत्पादक-विक्रेता व ग्राहक या सर्वच व्यावसायिक घटकांकडून वाढता प्रतिसाद मिळत आहे.
दत्तात्रय अंबुलकर