बदलत्या परिस्थितीमुळे सुखदु:खाचे प्रसंग वाट्याला येतात
अध्याय दुसरा
भगवंत म्हणाले, अर्जुना, समोरच्या कौरवांचे शरीर जरी नष्ट झाले तरी त्यांचा आत्मा अमर असल्याने त्याना दुसरे शरीर प्राप्त होणार आहे. प्रत्येकाच्या शरीरात असलेला आत्मा ही कायम टिकणारी वस्तु असून ती अविनाशी आहे, हे जो जाणतो त्याला तात्पुरते अस्तित्व असलेल्या शरीराचा नाश झाला तरी दु:ख होत नाही. हे जग खरे आहे असे मानणारा मनुष्य मात्र इंद्रियाच्या ताब्यात जातो, त्यांनी सुचवलेले विषयांचे सेवन करतो आणि सुखदु:खाच्या तडाख्यात सापडतो ह्या अर्थाचा
शीतोष्ण विषय-स्पर्श सुख-दु:खात घालिती ।
करी सहन तू सारे येती जाती अनित्य ते ।। 14 ।।
हा श्लोक आपण अभ्यासत आहोत. धैर्यशील, ज्ञानी पुरुष मात्र ती सहन करतो कारण विषयसेवनातून मिळणाऱ्या सुखदु:खांशी त्याला काहीच देणेघेणे नसते. त्यामुळे तो मोक्षलाभास पात्र असतो. वाट्याला येणारे विषय क्षणभंगुर आहेत आणि ते कायम टिकणारे सुख देऊ शकत नाहीत, म्हणून माणसाने इंद्रियांनी कितीही प्रलोभने दाखवली तरी त्यांच्या आहारी जाऊ नये. ह्याप्रमाणे जे वर्तन करतील त्यांना मोक्ष मिळेल. मोक्ष ही जिवंतपणीच प्राप्त करून घेण्याची अवस्था असून ती चिरंतन सुखदायी आहे. माणसाच्या परिस्थितीत सतत बदल होत असल्याने सुखदु:खाचे प्रसंग आलटून पालटून त्याच्या वाट्याला येतात पण मोक्ष प्राप्त झालेला मनुष्य कोणत्याही परिस्थितीत विचलित होत नाही.
हे तत्वज्ञान जाणणारे ज्ञानी जीवनाकडे तटस्थ वृत्तीने बघतात. रेल्वे स्टेशनवर विरंगुळा म्हणून तिथल्या बाकावर बसलेला माणूस नुसते आजूबाजूला काय घडते ते पहात असतो. त्यामुळे एखादी गाडी आली किंवा नाही ह्याचे त्याला काहीच देणेघेणे नसते पण ज्याला गावाला जायचे असते तो मात्र गाडी वेळेवर आली नाही तर नाराज होतो कारण तो त्या गाडीत गुंतलेला असतो. ज्या गोष्टीत माणसाचा जीव गुंतलेला असतो त्या गोष्टीची त्याला आपुलकी वाटत असल्याने त्या वस्तूच्या असण्यानसण्याने त्याला फरक पडतो.
माणसाच्या देहाची निर्मिती पंचमहाभूतांपासून होते. ही पंचमहाभूते त्रिगुणांनी युक्त असतात. मनुष्य देहात जेव्हा ईश्वरी अंश असलेला आत्मा प्रवेश करतो तेव्हा तो देहातल्या त्रिगुणांनी लिप्त होतो. त्याला जीवात्मा किंवा जीव असे म्हणतात. ह्या जीवाला त्याने प्रवेश केलेल्या शरीराबद्दल ममत्व वाटू लागते. ज्याप्रमाणे खूप दिवस जेव्हा एखादा मनुष्य भाड्याच्या जागेत राहतो तेव्हा त्याला त्या जागेबद्दल ममत्व वाटू लागते, ती जागा आपल्या मालकीची आहे असा त्याचा समज होतो. तसे जीवात्म्याला देहाबद्दल आपुलकी वाटू लागते. त्यात ज्ञानेंद्रिये त्याला विषयांची ओळख करून देतात. ज्ञानेन्द्रियांकडून मिळालेल्या माहितीमुळे जीवात्म्याला विषयांचे आकर्षण वाटू लागते आणि त्यातील आवडीचे विषय भोगण्यासाठी तो धडपडू लागतो. त्यासाठी स्वत:चे मूळ स्वरूप विसरून, तो खालच्या पायरीवर उतरतो आणि स्वत:ला कर्ता म्हणवतो. खरं बघितलं तर प्रारब्धानुसार जे सुखदु:खाचे प्रसंग वाट्याला येतील त्याकडे अलिप्तपणे पाहणे आणि त्रिगुणाच्या कचाट्यातून सुटून, ईश्वराला कसे जाऊन मिळता येईल ह्यावर लक्ष केंद्रित करणे हे जीवात्म्याचे काम आहे पण ह्याकडे दुर्लक्ष करून तो विषयांचे भोग जास्तीतजास्त मिळवण्यासाठी धडपडत राहतो. त्यामुळे स्वरूपाकडे जाण्यासाठी आवश्यक आहे ते न करता देहातच अधिकाधिक गुरफटले जाण्याची घोडचुक करण्यावरच त्याचा भर असतो.
क्रमश: