चांगी : जगातील सर्वोत्कृष्ठ विमानतळ
सिंगापूरचे चांगी विमानतळ हे जगातले सर्वोत्कृष्ट विमानतळ म्हणून घोषित झाले आहे. स्कायटॅक्स यांच्या सर्वेक्षणामध्ये चांगीची सर्वोत्कृष्ट विमानतळ म्हणून निवड केली गेली आहे. स्कायट्रॅक्सचे मुख्यालय युनायटेड किंगडममधील लंडनमध्ये असून व्यावसायिक विमानसेवा, आंतरराष्ट्रीय प्रवाशांकडून व इतरांकडून माहिती मिळवत व सर्वेक्षण करत उत्कृष्ठ विमानतळांची निवड करत असते. सिंगापूरचे चांगी हे विमानतळ सर्वोच्च आरामदायी सोयीसुविधांसाठी आणि उत्तम मनोरंजनासाठी प्रसिद्ध आहे. या विमानतळाचा परिसर इतका मनमोहक आहे की एखादे पर्यटन स्थळही त्यापुढे कमी पडेल.
वरील सर्वेक्षणाच्या माध्यमातून 100 विमानतळे जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये भारतातील चार विमानतळांचाही समावेश आहे. यात दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ 32 व्या स्थानावर आहे. भारतातील हे सर्वात व्यस्त विमानतळ असून आधुनिक टर्मिनल्स, उत्तम कलाकृती, उत्तम संपर्क व्यवस्था यासारख्या सेवेमुळे अधिक लोकप्रिय झाले आहे. यासोबत बेंगळूरचे केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे 48 व्या क्रमांकावर आहे. या विमानतळावरील दोन नंबरचे टर्मिनल हे निसर्गाशी प्रेरित असून तेथील हिरवळ, कला आणि मोकळी जागा विमान प्रवाशांना आवडते, असे दिसून आले आहे. हैदराबादचे राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ 56 व्या क्रमांकावर आहे तर मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ 73 व्या स्थानावर आहे.
अलीकडच्या काळामध्ये भारतीय विमानतळांच्या रँकिंगमध्ये सुधारणा झालेली असली तरी आघाडीवरच्या 20 विमानतळांच्या यादीमध्ये भारतातील एकाही विमानतळाचा समावेश नाही आहे. दिल्ली 36 व्या स्थानावरून 32 व्या स्थानावर, बेंगळूर 58 व्या स्थानावरून 48 व्या स्थानावर तर हैदराबाद विमानतळ 59 व्या स्थानावरून 56 व्या स्थानावर आले आहे. मुंबई विमानतळ 95 स्थानावरून यंदा 73 व्या स्थानावर आले आहे.
मुंबई विमानतळाची यादीतील वरचढ ठरलेली कामगिरी निश्चितच कौतुकास पात्र आहे.
चांगी विमानतळ हे 2024 मध्ये पाहता दुसऱ्या स्थानी होते. त्यावर्षी कतार दोहामधील हमाद विमानतळ पहिल्या स्थानावर होते. यंदा चांगी विमानतळाची निवड करण्यात आली असून हे विमानतळ अनेक वैशिष्ट्यांनी युक्त आहे. या विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांसाठी 48 तास आधी चेकिंग करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे दागिन्यांचा विशाल मॉल, सुंदरतेने नटलेले इंडोर गार्डन, फुलपाखरांचे केंद्र व जगातील सर्वात उंच इंडोर वॉटरफॉल रेन वोर्टेक्स वॉटरफॉल या ठिकाणी असून ते प्रमुख आकर्षण आहे. या धबधब्याची उंची 40 मीटर इतकी असल्याचे सांगितले जाते. यासोबतच या विमानतळावर स्पा सारख्या सुविधा असून विविध खाद्यपदार्थांची हॉटेल्स त्याचप्रमाणे म्युझियम, कला प्रदर्शन हॉल, सिनेमा आणि डायनासोर थीमवरील पार्कही पाहायला मिळते. सदरच्या विमानतळाच्या विकासासाठी येणाऱ्या काळात 16700 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. या अंतर्गत त्या ठिकाणी पाचवे टर्मिनल बांधले जाणार असून ज्याची सुरुवात 2030 पर्यंत होऊ शकते.
आघाडीवरची 10 विमानतळे पाहूया
► चांगी सिंगापूर ► हमाद दोहा
► हनेदा टोकीयो ► इंचेओन सेऊल
► नरीता टोकीयो ► हाँगकाँग
► सीडीजी पॅरीस ► फ्युमिसीनो रोम
► म्युनिच ► झुरीच
देशातल्या विमानतळांसाठी
1 लाख कोटी
देशातील विमानतळांच्या सुधारणांसाठी भारताकडून नेटाने प्रयत्न केले जात असून मिळालेल्या माहितीनुसार पुढील चार ते पाच वर्षांमध्ये 1 लाख कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याचे समजते. देशभरातील विविध विमानतळांवर प्रवाशांची संख्या वाढती असून अधिकाधिक विमान सेवांची मागणी ग्राहकांकडून केली जात आहे. या अनुषंगाने विमानतळांची व्यवस्था उत्तम आणि विस्तारित करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. या उद्देशानेच आगामी काळामध्ये 1 लाख कोटी रुपयांची रक्कम विकासकामांसाठी खर्चली जाणार आहे.
पुढील चार ते पाच वर्षांमध्ये ही गुंतवणूक टप्प्याटप्प्याने केली जाणार असून हरित प्रकल्पांतर्गत नोएडा जवळील जेवर, नवी मुंबई, भोगापुरम आणि परंदुर (चेन्नई) ही विमानतळे लवकरच सेवेत दाखल होणार आहेत. याव्यतिरिक्त बेंगळूर, हैदराबाद, कोचीन, मुंबई आणि नागपूर या विमानतळांचा विस्तारही केला जाणार आहे. भारतीय हवाई प्राधिकरणातर्फे विविध विमानतळांचे विस्तारीकरणही केले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार येणाऱ्या काही वर्षांमध्ये विमान प्रवाशांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ अपेक्षित आहे. वर्षाच्या आधारावर पाहता विमान प्रवाशांची संख्या वार्षिक सात ते नऊ टक्के वाढीव दिसून येणार आहे. आर्थिक वर्ष 2026 पर्यंत विमान प्रवाशांची संख्या 440 ते 450 दशलक्ष वर पोहोचणार आहे. आर्थिक वर्ष 2025 मध्ये दहा टक्के वाढीसह विमान प्रवाशांची संख्या 412 ते 415 दशलक्षवर पोहोचेल असेही म्हटले जाते. एवढेच नव्हे तर विमानतळांच्या महसुलामध्ये सुद्धा वर्षाच्या आधारावर 18 ते 20 टक्के वाढ दिसणार आहे.
-दीपक कश्यप