जियो आयपीओच्या सादरीकरणामध्ये होणार बदल
रिलायन्सकडून माहिती : नवे समभाग सादर करण्याची योजना
वृत्तसंस्था, मुंबई
प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीज यांनी आपल्या जियोच्या आयपीओ सादरीकरणामध्ये काही बदल करण्याचे ठरवले असल्याचे समजते. या नव्या बदलानुसार नवे समभाग सादर करण्याची कंपनी तयारी करते आहे. असे झाल्यास सध्याच्या गुंतवणूकदारांची हिस्सेदारी ही कमी होऊ शकेल.
रिलायन्स इंडस्ट्रीज दूरसंचार व डिजिटल क्षेत्रातील सहकारी कंपनी जियो प्लॅटफॉर्मचा आयपीओ सादर करण्याच्या प्रक्रियेमध्ये गुंतली असून यामध्ये बदल करण्याची योजना आखत आहे. कंपनी आता जुन्या गुंतवणूकदारांची हिस्सेदारी विक्री करण्याऐवजी नवे समभाग जारी करण्यावर विचार करते आहे. असे झाल्यास आयपीओमधून उभारलेली रक्कम पूर्णपणे जियोच्या खात्यामध्ये जाणार आहे.
आयपीओ किमत
रिलायन्स सध्याला जास्त आक्रमक किंमत निश्चित करण्याच्या बाजूने नसल्याचे समजते. कंपनीला वाटते की लिस्टिंगच्या दिवशी छोट्या गुंतवणूकदारांचे नुकसान होऊ नये, हे पाहिले जात आहे. पहिल्यांदा समभाग शेअर बाजारामध्ये सूचीबद्ध होऊ देत आणि त्यानंतर बाजारालाच स्वत:हून कंपनीची योग्य किंमत ठरवू दे, असा विचार कंपनीचा आहे. यानंतरच खासगी इक्विटी गुंतवणूकदार टप्प्याटप्प्याने आपली हिस्सेदारी विकू शकतात. सदरच्या आयपीओच्या माध्यमातून उभारलेल्या रकमेचा वापर कंपनी कर्जाचा भार कमी करण्यासाठी करणार आहे.
20 वर्षानंतर मोठा आयपीओ
कंपनीकडून दिलेल्या माहितीनुसार 20 वर्षानंतर रिलायन्सचा एवढा मोठा आयपीओ सादर होणार आहे. कंपनीने या आयपीओच्या प्रक्रियेला गेल्या मार्चमध्ये वेग दिला आहे. यासाठी कंपनीने मोठ्या दिग्गज गुंतवणूक बँकांना सामील करून घेतले आहे. पुढील एक दोन आठवड्यांमध्ये आयपीओशी संबंधित अर्ज जमा केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात असून जुलैपर्यंत कंपनीचे समभाग शेअर बाजारात सूचीबद्ध होऊ शकतात, अशी माहिती ब्लूमबर्ग यांच्या माध्यमातून कळते आहे.