राज्य मंत्रिमंडळात लवकरच बदल
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे संकेत
पणजी/ विशेष प्रतिनिधी
राज्य मंत्रिमंडळाची फेररचना लवकरच केली जाईल, असे संकेत मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी दिली. यामुळे या महिन्याच्या अखेरपर्यंत सावंत मंत्रिमंडळाची फेररचना निश्चित आहे यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.
गेले दोन महिने राज्य मंत्रिमंडळाची फेररचना होईल, असे संकेत मिळत होते, मात्र लोकसभा निवडणुका असल्यामुळे फेररचनेचा प्रस्ताव पुढे ढकलण्यात आला होता. मंत्रिमंडळातील काही सदस्यांनी ज्या पद्धतीचे वर्तन केले आहे त्याची दखल केंद्र सरकारने तथा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतलेली आहे आणि त्यामुळेच लोकसभा निवडणुकीनंतरच फेररचना करण्यास पक्षश्रेष्ठींनी मंजुरी दिली होती आता त्याची अंमलबजावणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना करावी लागणार आहे.
राज्य विधानसभेचे 18 दिवसीय अधिवेशन आणि त्याची तयारी करण्यासाठी आणखी काही दिवस यामुळे सातत्याने सकाळपासून रात्री उशिरापर्यंत काम करणाऱ्या डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी संपूर्ण दिवस सांखळी येथे आपल्या कुटुंबासमवेत घालविला. विश्रांती विरहित काम करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आपल्या कुटुंबीयांसाठी थोडा वेळ द्यावा असे वाटले आणि ते शनिवारी दिवसभर सांखळीत राहिले. प्रस्तुत प्रतिनिधीशी त्यांची चर्चा झाली. यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळाची फेररचना लवकरच केली जाईल एवढे एकच वाक्य स्पष्ट केले. ही रचना नेमकी कधी होईल आणि कोणाला नव्याने मंत्री केले जातील किंवा कोणाला वगळले जाईल याबाबत कोणतीही माहिती देण्यास नकार दिला, मात्र ही रचना केली जाईल व ती लवकरच होईल एवढेच ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या या निवेदनामुळे आता मंत्रिमंडळाची फेररचना अटळ आहे. केवळ मुहूर्ताची वाट पाहिली जात आहे.