महावीर जयंतीमुळे दहावी परीक्षा वेळापत्रकात बदल
तृतीय भाषा विषयाचा पेपर 30 ऐवजी 31 मार्च रोजी होणार
बेंगळूर : राज्यात 18 मार्चपासून दहावी परीक्षेला प्रारंभ झाला आहे. काही विषयांचे पेपर संपले आहेत. मात्र, 30 मार्च रोजी होणारे तृतीय भाषा इंग्रजी, कन्नड, हिंदी, उर्दु, अरेबिक, संस्कृत, कोकणी, मराठी, तुळू विषयांचे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत. महावीर जयंतीनिमित्त सोमवार, 30 मार्चऐवजी मंगळवार, 31 मार्च रोजी तृतीय भाषा विषयांचे पेपर होणार आहेत. कर्नाटक शालेय शिक्षण आणि मूल्यमापन मंडळाने गुरुवारी याबाबतचे पत्रक जारी केले आहे.
2026 सालातील दहावी परीक्षा-1 मार्च 18 ते एप्रिल 2 या कालावधीत होत आहे. 4 नोव्हेंबर रोजी परीक्षेचे अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानुसार परीक्षेलाही प्रारंभ झाला. वेळापत्रकानुसार तृतीय भाषा विषयांचा पेपर 30 मार्च रोजी होणार होता. मात्र, 26 मार्च रोजी सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार महावीर जयंतीनिमित्त शासकीय सुटी मंगळवार 31 ऐवजी सोमवार 30 रोजी असा बदल करण्यात आला. त्यामुळे 30 रोजीचे तृतीय भाषा विषयांचे पेपर 31 रोजी होतील. उर्वरित विषयांचे पेपर पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार होतील, असे परीक्षा मंडळाने आदेशपत्रकात म्हटले आहे.