व्हीटीयूच्या इयरबॅक पॉलिसीमध्ये बदल करा
विद्यार्थ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
बेळगाव : एका वर्षात चारहून अधिक विषयात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना व्हीटीयूकडून पुढील वर्षासाठी प्रवेश दिला जात नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे व्हीटीयूने इयरबॅक पॉलिसीमध्ये बदल करावा, अशी मागणी व्हीटीयूच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली. 2022 मध्ये इयरबॅक सिस्टीम सुरू करण्यात आली. 4 पेक्षा कमी विषयात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच पुढील सत्राला प्रवेश घेऊन अनुत्तीर्ण झालेल्या विषयांच्या परीक्षेला बसण्याची परवानगी होती. परंतु जर चारपेक्षा अधिक विषयात विद्यार्थी अनुत्तीर्ण असेल तर त्याला पुढील सत्राला प्रवेश घेता येत नाही. वर्षभर घरीच राहून अनुत्तीर्ण विषय सोडवून त्यानंतरच त्याला पुढील प्रवेश दिला जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, याबाबत तोडगा काढण्याची मागणी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. याबरोबरच इतर प्रश्नांबाबतही विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे. प्राध्यापकांकडून विद्यार्थ्यांना कमी गुण दिले जात असल्याबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्यावतीने शिरस्तेदार एस. एम. परगी यांनी निवेदन स्वीकारले.