सावंतवाडी रेल्वे स्थानकावरील ‘सावंतवाडी रोड’ नावाचा फलक बदला
रेल्वे प्रवासी संघटनेचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना निवेदन
न्हावेली / वार्ताहर
रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरण लोकार्पण सोहळ्यास उपस्थित पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव मिहीर मठकर यांनी भेट घेतली. नुतनीकरणावेळी ‘सावंतवाडी रोड’ असा लावलेला फलक बदलून त्या ठिकाणी ‘सावंतवाडी रेल्वे टर्मिनस’ असा फलक लावण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच रखडलेल्या रेल्वे टर्मिनसचा विषय मार्गी लावण्याबाबत पालकमंत्री यांचे लक्ष वेधले.सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे भूमिपूजन २७ जून २०१५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते तर पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झाले आहे. त्यानंतर पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण झाली आहेत. त्यावेळी “सावंतवाडी रेल्वे टर्मिनस” नावाची भूमिपूजन कोनशिला आवारात बसविण्यात आली आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने बाह्य सुशोभीकरण केले. तेथे “सावंतवाडी रोड” अशा स्वरूपाचा सुशोभीकरणानंतर फलक लावण्यात आलेला आहे. त्याठिकाणी ”सावंतवाडी रेल्वे टर्मिनस” असा फलक लावण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला कोकण रेल्वेचे शिल्पकार ”प्रा. मधु दंडवते” यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी सातत्याने जनतेतून होत आहे. त्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. तसेच सावंतवाडी रेल्वे टर्मिनस दर्जाची कामे व्हावीत. तसेच अधिकच्या रेल्वे गाड्यांना थांबा, पाणी भरण्याची सुविधा आणि इतर प्रवासी सुविधांची निर्मिती झाली पाहिजे. त्यासाठी कोकण रेल्वे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना स्वतंत्र निवेदन दिलीत. यात पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी लक्ष घालून मागण्यांची पूर्तता करावी अशी विनंती यावेळी मिहीर मठकर यांनी प्रवासी संघटनेकडून केली.यावेळी माजी आमदार राजन तेली जिल्हा बॅंक संचालक रविंद्र मडगावकर,माजी सभापती राजू परब,सरपंच हनुमंत पेडणेकर,बंटी पुरोहित गुरुनाथ गावकर आदी मान्यवर उपस्थित होते.