गाव एक बसथांब्यावर नाव भलतेच!
बेळगाव तालुक्यातील प्रकार : प्रवाशांमध्ये संभ्रम
बेळगाव : बसथांब्याची रंगरंगोटी केल्यानंतर गावाचेच नाव बदलण्याचा प्रकार सध्या बेळगाव तालुक्यात घडला आहे. एअरपोर्ट रोडवरील निलजी गावानजीकच्या तीन बसथांब्यांवर चुकीचा उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होत असून प्रशासनाने तातडीने हा चुकीचा उल्लेख बदलावा, अशी मागणी केली जात आहे. निलजी गावच्या बसथांब्यांवर यापूर्वी कन्नड व इंग्रजीमध्ये निलजी असा उल्लेख करण्यात आला होता. परंतु नंदिनी दूध कंपनीकडून या बसथांब्यांवर रंगरंगोटी करण्यात आले. यावेळी बसथांब्यांचे नाव बदलून मुतगा असा उल्लेख करण्यात आला आहे. वास्तविक पाहता ‘मुतगा’ गाव ‘निलजी’ बसथांब्यापासून दोन ते अडीज किलोमीटर लांब आहे. यामुळे परगावच्या प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. चार दिवसांपासून प्रवाशांची गैरसोय होत असून वायव्य परिवहन मंडळाने तातडीने या ठिकाणचा चुकीचा उल्लेख बदलावा, अशी मागणी होऊ लागली आहे. चूक दुरुस्त न केल्यास आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
परिवहन मंडळाने चूक सुधारावी
निलजी गावानजीक तीन बसथांबे आहेत. यापूर्वी या बसथांब्यांवर कन्नड व इंग्रजीमध्ये ‘निलजी’ असा उल्लेख होता. परंतु रंगरंगोटी करताना या ठिकाणी ‘मुतगा’ असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे परिवहन मंडळाने प्रवाशांची गैरसोय टाळत ही चूक तातडीने बदलावी.
रामचंद्र मोदगेकर (माजी जि. पं. सदस्य)