राहुल गांधींच्या यात्रेच्या नावात बदल; ‘भारत जोडो न्याय यात्रा’ या नावावर शिक्कामोर्तब
उत्तर प्रदेशमध्ये घालवणार सर्वाधिक वेळ
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
काँग्रेसने 14 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या भारत न्याय यात्रेचे नाव बदलले आहे. आता या पदयात्रेचे नाव ‘भारत जोडो न्याय यात्रा’ असे असेल. दिल्लीतील मुख्यालयात गुऊवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ‘भारत जोडो यात्रा’ हे नाव आता एक ब्रँड बनल्याचा दावा पक्षाने केला आहे. ‘भारत जोडो न्याय यात्रे’तील प्रवास आपल्या देशाच्या आणि पक्षाच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरेल असा आशावाद व्यक्त करण्यात आला. तसेच देशात परिवर्तन आणि संघटनेत नवसंजीवनी आणण्यासाठी ही पदयात्रा मोलाची भूमिका निभावेल, असे सांगण्यात आले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह पक्षाचे सर्व सरचिटणीस, प्रदेश प्रभारी, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते उपस्थित होते. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची तयारी आणि लोकसभा निवडणुकीची रणनीती यावर बैठकीत चर्चा झाली.
पक्षाध्यक्षांकडून मार्गदर्शन
बैठकीमध्ये पक्षाध्यक्ष खर्गे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. पदयात्रेतील यश आमच्यासाठी महत्त्वाचे असून त्यासाठी आम्हाला वेळ द्यावा लागेल. तुम्ही लोक पक्षाचे डोळे आणि कान आहात, असे खर्गे म्हणाले. आता आमच्याकडे फक्त तीन महिने असून त्यामध्ये आम्हाला एक टीम म्हणून पक्षासाठी रात्रं-दिवस मेहनत करावी लागणार असल्याचे सांगितले. यासोबतच आपसातील मतभेद मीडियात वाढवू नयेत, असा सल्लाही त्यांनी दिला.
मोदी सरकारवर टीका
या बैठकीत काँग्रेस अध्यक्षांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही जोरदार निशाणा साधला. पंतप्रधानांनी आजपर्यंत मणिपूरला भेट दिली नाही, यावरून ते राष्ट्रीय प्रश्नांवर किती बेजबाबदारपणे वागतात हे दिसून येते. भाजपने गेल्या 10 वर्षात एकही काम केले नाही ज्याला यश मानता येईल. संपुआ-काँग्रेसच्या काळातील योजनांचे नाव आणि स्वरूप बदलण्याचे काम मोदी सरकार करत असून ते ईडी, सीबीआय आणि आयटीसारख्या संस्थांचा उघडपणे गैरवापर करत असल्याचाही आरोप केला.