राहुल गांधींच्या यात्रेच्या नावात बदल; ‘भारत जोडो न्याय यात्रा’ या नावावर शिक्कामोर्तब
उत्तर प्रदेशमध्ये घालवणार सर्वाधिक वेळ
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
काँग्रेसने 14 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या भारत न्याय यात्रेचे नाव बदलले आहे. आता या पदयात्रेचे नाव ‘भारत जोडो न्याय यात्रा’ असे असेल. दिल्लीतील मुख्यालयात गुऊवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ‘भारत जोडो यात्रा’ हे नाव आता एक ब्रँड बनल्याचा दावा पक्षाने केला आहे. ‘भारत जोडो न्याय यात्रे’तील प्रवास आपल्या देशाच्या आणि पक्षाच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरेल असा आशावाद व्यक्त करण्यात आला. तसेच देशात परिवर्तन आणि संघटनेत नवसंजीवनी आणण्यासाठी ही पदयात्रा मोलाची भूमिका निभावेल, असे सांगण्यात आले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह पक्षाचे सर्व सरचिटणीस, प्रदेश प्रभारी, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते उपस्थित होते. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची तयारी आणि लोकसभा निवडणुकीची रणनीती यावर बैठकीत चर्चा झाली.
डिसेंबर 2023 मध्ये पक्षात केलेल्या फेरबदलानंतर नवनियुक्त सरचिटणीस आणि प्रदेश प्रभारींसोबत पक्ष नेतृत्वाची ही पहिलीच बैठक आहे. दिल्लीत होणाऱ्या या बैठकीपूर्वी काँग्रेस नेतृत्वाने राज्यातील नेत्यांच्या स्वतंत्र बैठका घेतल्या असून, त्यात निवडणुकीच्या तयारीसाठी रणनीती आखण्यात आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी नव्या पदयात्रेची सविस्तर माहिती उघड केली आहे. या यात्रेचे नाव आता “भारत जोडो न्याय यात्रा” असे करण्यावर सर्व नेत्यांचे एकमत झाले. राहुल गांधींचा प्रवास 14 जानेवारी रोजी दुपारी 12.30 वाजता इंफाळ, मणिपूर येथून सुरू होईल. ही यात्रा मणिपूरनंतर ते नागालँडमार्गे मेघालय, त्यानंतर आसाम, अऊणाचल प्रदेश आणि परत आसाममध्ये प्रवेश करेल. त्यानंतर पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, उत्तर प्रदेश, गुजरातमार्गे महाराष्ट्रात दाखल होईल. या यात्रेसाठी काँग्रेस पक्षाने ‘इंडिया’ आघाडीतील सर्व पक्षांना निमंत्रित केले आहे. ही यात्रा देशातील एकूण 15 राज्यांमधून जाणार आहे. यावेळी राहुल 6,700 किलोमीटरचा प्रवास करतील. सर्वात लांबचा प्रवास हा उत्तर प्रदेशमध्ये असून 1,074 किलोमीटर इतके अंतर कापले जाईल. या कालावधीत ते 11 दिवसांत राज्यातील 20 जिल्ह्यांमधून प्रवास करणार आहेत.
पक्षाध्यक्षांकडून मार्गदर्शन
बैठकीमध्ये पक्षाध्यक्ष खर्गे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. पदयात्रेतील यश आमच्यासाठी महत्त्वाचे असून त्यासाठी आम्हाला वेळ द्यावा लागेल. तुम्ही लोक पक्षाचे डोळे आणि कान आहात, असे खर्गे म्हणाले. आता आमच्याकडे फक्त तीन महिने असून त्यामध्ये आम्हाला एक टीम म्हणून पक्षासाठी रात्रं-दिवस मेहनत करावी लागणार असल्याचे सांगितले. यासोबतच आपसातील मतभेद मीडियात वाढवू नयेत, असा सल्लाही त्यांनी दिला.
मोदी सरकारवर टीका
या बैठकीत काँग्रेस अध्यक्षांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही जोरदार निशाणा साधला. पंतप्रधानांनी आजपर्यंत मणिपूरला भेट दिली नाही, यावरून ते राष्ट्रीय प्रश्नांवर किती बेजबाबदारपणे वागतात हे दिसून येते. भाजपने गेल्या 10 वर्षात एकही काम केले नाही ज्याला यश मानता येईल. संपुआ-काँग्रेसच्या काळातील योजनांचे नाव आणि स्वरूप बदलण्याचे काम मोदी सरकार करत असून ते ईडी, सीबीआय आणि आयटीसारख्या संस्थांचा उघडपणे गैरवापर करत असल्याचाही आरोप केला.