चांद्रयान-4 चा रोव्हर अधिक शक्तिमान
इस्रोकडून माहिती, पुढील चांद्रअभियान लवकरच
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारताची अवकाश संशोधन संस्था इस्रो लवकरच पुढच्या चांद्रअभियानासाठी सज्ज होणार आहे. पुढील चांद्रयानाचा रोव्हर (चांद्रवाहन) हा पूर्वीच्या चांद्रवाहनाच्या तुलनेत 12 पट अधिक शक्तीशाली असेल, अशीही माहिती उपलब्ध झाली आहे. पुढचे चांद्रअभियान अधिक महत्वाकांक्षी असेल, स्पेस अप्लिकेशन सेंटर या संस्थेचे संचालक निलेश देसाई यांनी या प्रस्तावित चांद्रवाहनासंबंधी माहिती दिली. हे चांद्रवाहन तब्बल 350 किलोग्रॅम वजनाचे असेल. चांद्रयान-3 मधील चांद्रवाहन केवळ 30 किलोग्रॅम वजनाचे होते. त्याने चंद्रावर केवळ 500 मीटर गुणिले 500 मीटर या क्षेत्रफळात प्रवास केला होता. मात्र नवे चांद्रवाहन 1 किलोमीटर गुणिले 1 किलोमीटर या क्षेत्रफळात प्रवेश करु शकेल. केंद्र सरकारची अनुमती मिळाल्यास 2030 पर्यंत, अर्थात आणखी सहा वर्षांमध्ये हे अभियान साकारु शकणार आहे. मात्र, इस्रोच्या अन्य काही अधिकाऱ्यांनी हे अभियान 2027 पर्यंत साकारु असा विश्वास व्यक्त केला आहे.
दीर्घकालीन अभियानांचा एक भाग
चांद्रयान-4 हे अभियान भारताच्या दीर्घकालीन अवकाश अभियानाचा एक भाग आहे. 2040 पर्यंत चंद्रावर मानव पाठविण्याची भारताची योजना आहे. या योजनेची पूर्वसज्जता म्हणून चांद्रयान-4 या अभियानाकडे पाहिले जात आहे. 2050 पर्यंत भारत चंद्रावर एक तळ स्थापन करण्याच्या विचारात आहे.
भारत महाशक्ती बनणार
भारत अवकाशक्षेत्रात महाशक्ती होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. इस्रो या संस्थेचा अवकाश प्रक्षेपण क्षेत्रात मोठा दबदबा आहे. नासाकडूनही इस्रोचे काहीवेळा कौतुक झाले आहे. केंद्र सरकारनेही इस्रोला मोठ्या प्रमाणावर धनसाहाय्य केले असून त्यामुळे महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेणे या संस्थेला शक्य झाले आहे. या अभियानांचा भारताला आर्थिकदृष्ट्याही लाभ भविष्यकाळात होणार असून अवकाशसंशोधन क्षेत्रात केलेली गुंतवणूक वाया जाणार नाही. आज भारत उपग्रह प्रक्षेपणात जगात चौथ्या क्रमांकाची शक्ती बनला आहे आणखी 30 ते 40 वर्षांमध्ये भारताची ओळख या क्षेत्रातील महाशक्ती म्हणून होईल, असा विश्वास अवकाश क्षेत्रात पूर्वी काम केलेल्या अनेक तज्ञांनी व्यक्त केला आहे.
यशाचे प्रमाण कौतुकास्पद
भारताने इस्रो या संस्थेच्या माध्यमातून आजवर अनेक उपग्रहांचे प्रक्षेपण अवकाशात केले असून इस्रोच्या यशाचे प्रमाण अनेक जागतिक गुणवत्तेच्या अवकाश संशोधन संस्थांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे या क्षेत्रातील भारताचा विश्वास आधिक वाढला असून त्यामुळे अधिक व्यापक आणि अधिक महत्वाकांक्षी योजना हाती घेतल्या जात आहेत. तंत्रविज्ञान क्षेत्रात हे सर्वाधिक प्रगतीचे क्षेत्र आहे.