लोकमान्य ग्रंथालयातर्फे आज चंद्रशेखर टिळक यांचे व्याख्यान
त. भा. प्रतिनिधी
बेळगाव : बुलकतर्फे रविवार दि. 31 मे रोजी सायंकाळी 6 वा. लोकमान्य ग्रंथालय येथे चंद्रशेखर टिळक यांचे ‘मला भावलेले गुलजार’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. राज्य मराठी विकास संस्था, मुंबईचे सहकार्य या कार्यक्रमाला लाभले आहे.
संपूर्णसिंह कालरा, ज्यांना जगभरात ‘गुलजार’ म्हणून ओळखले जाते, हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. ते कवी, गीतकार, लेखक, पटकथा लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक असून हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानासाठी विशेष प्रसिद्ध आहेत. उर्दू साहित्यातील त्यांच्या लेखनाला भावनांची गहिरी अभिव्यक्ती आणि भाषेची समृद्धता यामुळे मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. या व्याख्यानात टिळक विशेषत: कवी आणि लेखक म्हणून असलेल्या गुलजार यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकतील.
चंद्रशेखर टिळक यांनी 40 वर्षे वित्तीय सेवा क्षेत्रात नोकरी केली. ते मुंबई शेअर बाजार, सेबी येथे 32 वर्षे उच्च पदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी नॅशनल पेन्शन सिस्टीमचे राष्ट्रीय प्रमुख म्हणून 10 वर्षे कार्यभार सांभाळला. हर्षद मेहता, केतन पारेखसहीत गाजलेल्या अनेक आर्थिक घोटाळ्यात प्रमुख तपासणी अधिकारी म्हणून त्यांचा सहभाग होता. तसेच 1986 पासून केंद्रीय अर्थसंकल्प या विषयावर सलग 39 वर्षे ते विवेचन करत आहेत. त्यांची आजपर्यंत 35 पुस्तके (एकूण 87 आवृत्त्या) प्रकाशित झाली आहेत.
हा कार्यक्रम येत्या रविवारी दि. 31 मे रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता लोकमान्य ग्रंथालय, वरेरकर नाट्या संघ, बेळगाव येथे होणार आहे.
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्थेचे अर्थसाहाय्य लाभलेले आहे.