For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मैत्रिणीची हत्या एका जिल्ह्यात केली आणि मृतदेह पुरला दुसऱ्या जिल्ह्यातील घरात; वरून फरशीही बसवली

11:15 AM Oct 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
मैत्रिणीची हत्या एका जिल्ह्यात केली आणि मृतदेह पुरला दुसऱ्या जिल्ह्यातील घरात  वरून फरशीही बसवली
Advertisement

नागपूर : चंद्रपूरमध्ये मैत्रिणीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह नागपूर जिल्ह्यातील हिंगणा येथील रिकाम्या घरात पुरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृतदेह पुरल्यानंतर त्यावर फरशी बसवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी संतोष साखरकर या शिक्षकाला पोलिसांनी अटक केली असून, वैशाली विलास टिपले असे मृत महिलेचे नाव आहे.

Advertisement

वादातून हत्या केल्याचा आरोप

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संतोष आणि वैशाली हे दोघेही चंद्रपूर शहरातील रहिवासी होते. त्यांच्यात जवळचे संबंध असल्याचे सांगितले जाते. १४ ऑक्टोबर रोजी दोघांमध्ये वाद झाला. या वादातून संतोषने वैशालीच्या छातीवर जड वस्तूने वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात तिचा मृत्यू झाल्याचे तपासात समोर आले.

Advertisement

कारच्या डिक्कीतून मृतदेह हिंगण्यात आणला

हत्येनंतर मृतदेह एका दिवसासाठी कारच्या डिक्कीत ठेवण्यात आल्याचा संशय आहे. त्यानंतर १५ ऑक्टोबर रोजी आरोपीने मृतदेह हिंगणा येथील आधारनगरी परिसरातील स्वतःच्या रिकाम्या घरात आणला. घरातील एका खोलीत खड्डा खोदून मृतदेह पुरण्यात आला. त्यानंतर खड्ड्यावर फरशी बसवून घटना लपवण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांच्या तपासातून उघड झाल्याचे वृत्त आहे.

मोबाईल कॉल डिटेल्समुळे तपासाला दिशा

वैशाली बेपत्ता असल्याची तक्रार मिळाल्यानंतर चंद्रपूर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान तिच्या तीन मोबाईल क्रमांकांच्या कॉल डिटेल्सची पडताळणी करण्यात आली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संतोषला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे वृत्त आहे.

यानंतर चंद्रपूर पोलिसांनी हिंगणा पोलिसांच्या मदतीने पंचांच्या उपस्थितीत शनिवारी रात्री सुमारे दीड वाजता घरातील पुरलेला मृतदेह बाहेर काढला. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

या घटनेमुळे चंद्रपूर आणि नागपूर परिसरात खळबळ उडाली आहे. हत्या नेमकी कशी घडली, पुरावे लपवण्यासाठी आणखी काही प्रयत्न झाले का आणि या प्रकरणातील इतर बाबी काय आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत.

Advertisement

.