चंद्रकांत वेजरे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील परोपकारी व्यक्तिमत्व
ओटवणे | प्रतिनिधी
चराठा तळखांबा येथील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील अग्रेसर व्यक्तिमत्व चंद्रकांत दाजी वेजरे (५०) यांचे कुवैत येथे मंगळवारी १४ ऑक्टोबर रोजी रात्री हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या आकस्मित निधनाने वेजरे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगरच कोसळला असुन त्यांच्या अकाली निधनाचा समस्त चराठावासियांना धक्काच बसला.गेल्या २० वर्षांपासून ते कुवैत येथील केओसी ऑइल कंपनीत कामाला होते. दोन महिन्याच्या सुट्टीवर ते गावी होते. सोमवारी १३ ऑक्टोबरला सायंकाळी ते कुवैतला गेले. मंगळवारी रात्री कामावर असतानाच त्यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. तेथील सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर शुक्रवारी पहाटे त्यांचे पार्थिव मुंबईत तर सायंकाळी दाभोळी विमानतळावर विमानाने आणण्यात आले. त्यानंतर रात्री त्यांचे शव सावंतवाडीत ठेवण्यात आले.त्यांचे पार्थिव आणण्यास तीन दिवस लागणार होते त्यामुळे त्यांच्या दुःखद निधनाची माहिती शुक्रवारी रात्री कुटुंबीयांना देण्यात आल्यानंतर पत्नी, आई मुलांसह वेजरे कुटुंबीयांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. शनिवारी सकाळी त्यांचे पार्थिव घरी आणल्यानंतर वेजरे कुटुंबीयांच्या आक्रोशाने उपस्थितांचे डोळे पाणवले. यावेळी शैक्षणिक, सामाजिक आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह चराठावासियांनी त्यांच्या घरी धाव घेत वेजरे कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यानंतर सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.परदेशात राहूनही त्यांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष चराठा गावच्या शैक्षणिक, सामाजिक व क्रिडा क्षेत्रात सक्रिय योगदान असायचे. गावी आले की ते गावच्या प्रत्येक कार्यात सक्रिय सहभाग घ्यायचे. परदेशात असूनही साधी राहणी मनमिळावू, शांत स्वभावासह परोपकारी व्यक्तिमत्त्वामुळे त्यांचे सर्वांशी जवळचे नाते होते. त्यांच्या पश्चात, पत्नी, आई, तीन मुली, एक मुलगा, बहिण, काकी, भावोजी असा परिवार आहे. चराठा येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा नं १ च्या शाळा व्यवस्थापन समिती सदस्या सुयश्री वेजरे यांचे ते पती होत तर दीपक वेजरे यांचे ते सख्खे चुलत भाऊ होत.