चंद्रकांत पाटीलांनी ताबडतोब राजीनामा द्यावा! आरक्षणाच्या कोणत्याही प्रक्रियेत सहभाग नसल्याने सकल मराठा समाजाची मागणी
कोल्हापूर प्रतिनिधी
मराठा आरक्षणसंदर्भात गठीत मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना आरक्षण व मनोज जरांगे- पाटील यांच्या आंदोलनासंदभातील कोणत्याही निर्णय प्रक्रियेत सहभागी करुन घेतले जात नाही. त्यामुळे मंत्री पाटील यांनी या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी सकल मराठा समाजाचे समन्वयक अॅड. बाबा इंदुलकर व वसंतराव मुळीक यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.
दसरा चौक येथे सकल मराठा समाजातर्फे मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरु आहे. या ठिकाणी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी भूमिका मांडली. इंदुलकर म्हणाले, राज्य सरकारने मराठा आरक्षणसंदर्भात गठीत मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना एकदाही जरांगे पाटील यांच्याशी चर्चेला पाठविलेले नाही. या उलट अमराठी असलेल्या मंत्री गिरिष महाजन यांना वारंवार जरांगे-पाटील यांच्याशी चर्चेला पाठविले जात आहे. या मागील सरकारचा हेतू कळत नाही. त्यामुळे मंत्री महाजन यांना यापुढे चर्चेला पाठवू नये. जोपर्यंत मराठा समाजातील मंत्री त्या ठिकाणी जाऊन आंदोलकांशी चर्चा करणार नाही, तोपर्यंत मराठ्यांच्या भावना सरकारपर्यंत खऱ्या अर्थानि पोहोचणार नाही.
मुळीक म्हणाले, मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी खासदार, आमदार व लोकप्रतिनिधींचे फोन येत आहेत. त्यांना आम्ही विनंती केली आहे की कोणताही सार्वजनिक कार्यक्रम घेऊ नयेत. तसेच सार्वजनिक कार्यक्रमांचे कोणतेही फलक लावणार नाही हे त्यांनी जाहीर करावे. त्याचबरोबर लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री शिंदे यांना भेटून तात्काळ आरक्षण देण्याबाबत सांगावे. मनोज जरांगे पाटील हे प्रत्येकाच्या मनात आहे. त्यामुळे यांच्या प्रकृतींची चिंता महाराष्ट्रातील घराघरातील प्रत्येकाला वाटू लागली आहे.
बाबा पार्टे म्हणाले, आरक्षणासाठी मराठा समाज घरदार सोडून रस्त्यावर उतरला आहे. पालकमंत्री मुश्रीफ यांनी मराठा समाजाच्या मागे उभे राहावे. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून सांगावे की आरक्षण था नाही तर मी तुम्हाला सोडून जातो. यावेळी शाहीर दिलीप सावंत, दिलीप देसाई, संदीप देसाई आदी उपस्थित होते.