Kolhapur Politics | चंद्रकांत पाटील–राजेश क्षीरसागर यांची बैठक: महापालिकेत महायुतीची एकजूट
भाजप ऑफिसमध्ये उच्चस्तरीय बैठक
कोल्हापूर : कोल्हापुरात महायुतीचे ठरले असून महापालिका निवडणूक एकत्र लढायचे निश्चित झाले आहे. शनिवारी नागाळा पार्क येथील भाजपच्या कार्यालयात भाजप नेते उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेचे आमदार राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यामध्ये बैठक झाली. बैठकीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये महापालिकानिवडणूक महायुती म्हणून एकत्र लढण्याचे ठरले आहे.
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर होते. त्यांनी भाजपच्या नागाळा पार्क येथील जिल्हा कार्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत महापालिका निवडणुकीबाबत सूचना केल्या. दरम्यान त्यांनी शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासोबत महापालिका निवडणुकी संदर्भात चर्चा केली.
बैठकीमध्ये अगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत कार्यकर्त्यांचा मान सन्मान ठेवू विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील दहाही उमेदवारांना निवडून देत मतदारांनी महायुती कौल दिला आहे. नेत्यांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी जिवाचं रान केले. आता हि निवडणुक कार्यकर्त्यांची आहे. त्यांनाही बळ देत निवडून आणणे आपली जबाबदारी आहे. जिल्ह्यातील मतदारांनी महायुती म्हणून दिलेल्या मतांचा अनादर महायुतीमधील कोणत्याही पक्षाकडून होणार नाही. याची दक्षता घेऊया आणि महायुती म्हणून एकत्र लढ्या, अशी चर्चा दोन्ही नेत्यांमध्ये झाली.
महायुतीच्या प्रमुख नेत्यांची समिती
महापालिका निवडणुकीसाठीची व्यूहरचना महायुतीकडून हिवाळी अधिवेशनानंतर आखली जाणार आहे. अधिवेशन संपल्यानंतर जिल्हयातील महायुतीच्या नेत्यांची बैठक होईल. त्यानंतर महापालिका निवडणुकीसाठी नेत्यांची एक समिती गठीत केली जाणार आहे. ही समिती निवडणुकीबाबतचे पुढील सर्व निर्णय घेणार आहे.