भाजपच्या ऑफरवर खासदार विशाल पाटलांचे सडेतोड उत्तर, 'अपक्ष म्हणून...
भाजपच्या विचारसरणीपासून माझी विचारसरणी खूप दूर आहे. त्यामुळे मी भाजपच्या विचारधारेकडे कधी वळेन, असे वाटत नाही
विटा : अपक्ष म्हणून निवडून आलो आहे आणि पुढची पाच वर्षे अपक्ष म्हणूनच राहणार आहे, अशी स्पष्टोक्ती खासदार विशाल पाटील यांनी केली. यामुळे खासदार विशाल पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला विराम मिळणार आहे. पारे येथे ग्रामदैवत दरगोबा यात्रेनिमित्त खासदार विशाल पाटील आले होते. यावेळी आमदार सुहास बाबर उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासदार विशाल पाटील यांना भाजप प्रवेशाचे खुले निमंत्रण दिले होते. मंत्री होण्यासाठी भाजपात जावे लागते, अशा आशयाचे विधान त्यांनी केले होते. साहजिकच यावर मतदार संघांमध्ये राजकीय चर्चा सुरू झाली.
या पार्श्वभूमीवर पारे येथे पत्रकारांनी खासदार पाटील यांच्याशी संवाद साधला. आपण भाजपमध्ये प्रवेश करणार आहात, अशा चर्चा सुरू असल्याबाबत विचारले असता, त्यांनी आपण अपक्ष म्हणून निवडून आलो आहे आणि पुढची पाच वर्षे अपक्ष म्हणूनच राहणार असल्याचे स्पष्ट केले. भाजपच्या विचारसरणीपासून माझी विचारसरणी खूप दूर आहे. त्यामुळे मी भाजपच्या विचारधारेकडे कधी वळेन, असे वाटत नाही. मात्र पुढची पाच वर्षे अशा प्रकारच्या चर्चा चालूच राहणार. त्याला काही इलाज नाही, असेही ते म्हणाले.
यावेळी खासदार पाटील म्हणाले, गेल्या वर्षी लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी मी पारे येथे आलो होतो. त्यावेळी येथील लोकांनी मला ग्रामस्थांनी जागृत देवस्थान असल्याचे सांगितलं होतं. उज्जैनच्या महांकाळेश्वरचे हे रूप आहे. मी दर्शनाला यावं, अशी दर्गोबाचीच इच्छा होती. गेल्या वेळी मी आलो, त्यावेळी लोकसभेची निवडणूक व्हायची होती. मला त्या निवडणुकीत मोठे यश मिळालं. त्यामुळे लाखो भाविकांच्या बरोबर मी आता खासदार म्हणून आलो आहे. या भागावर स्व. आमदार अनिल भाऊ बाबर यांचे विशेष लक्ष होते. त्यांनी मोठी काम या भागात केली आहेत. राजकीय मतं, विचार जरी वेगळे असले, तरी मी पुढच्या काळात पारे आणि परिसराच्या विकासासंदर्भात काही विशेष गोष्टी करणार आहे, ते आपल्याला पाहायला मिळतीलच,