Sangli News : 'प्राथमिक'च्या ढिसाळपणाचे चंद्रकांतदादांनी काढले वाभाडे
जिल्हा नियोजन बैठकीत पालकमंत्री चंद्रकांतदादांचा रूद्रावतार
सांगली : पालकमंत्री चंद्रकांतदादा म्हणजे प्रेमळ माणूस, बोलण्यात गोडवा असणारे, ते सहसा कोणावर रागावत नाहीत अथवा आवाजही वाढवून बोलत नाहीत असा त्यांचा लौकिक. पण अधूनमधून ते रूद्रावतार धारण करतात. असाच प्रकार शुक्रवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीत घडला.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाला नियोजन समितीमधून ५३ कोटी मंजूर करण्यात आले आहेत. पण त्या कामांच्या प्रशासकीय मान्यताही झालेल्या नाहीत. आढावा बैठकीत याचा जाब विचारला असता 'तोंडावळा' करणाऱ्या शिक्षण अधिकाऱ्यांची त्यांनी चांगलीच खरडपट्टी काढली. याची जोरदार चर्चा आहे.
नियोजन समितीमध्ये मंजूर निधी शंभर टक्के खर्च झाला पाहिजे. त्या दृष्टीने तातडीने प्रशासकीय मान्यता देऊन निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सुचना पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिल्या आहेत. त्यासाठी त्यांचा सातत्याने यंत्रणाकडे पाठपुरावाही सुरू असतो. शुक्रवारी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत सर्व यंत्रणांच्या कामांचा आढावा घेतला. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा आणि शिक्षणाचा ५३ कोटी अखर्चिक निधीवरून आढावा बैठकीत शिक्षणाधिकाऱ्यांना झापले.
दर्जा सुधारणे, सोयी सुविधा निर्माण करणे यासाठी सुमारे ५३ कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्या कामांच्या मंजूरी आणि प्रशासकीय मान्यतेसंदर्भात माहिती विचारली असता प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी काहीच केले नसल्याचे उघडकीस आले. शिक्षण विभागाच्या या बेपर्वाईबद्दल पालकमंत्री पाटील यांनी जाब विचारता अधिकाऱ्यांनी तांत्रिक मुद्दे आणि शासकीय आदेशाचे कारण देत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
त्यामुळे पालकमंत्री चंद्रकांतदादा संतापले. थेट त्यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांनाचा फोन लावण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर कोणाच्या तरी पाठिंब्यावर मनमानी करत असाल तर निलंबीतचा इशाराही दिला. अपवादानेच आवाज वाढवून बोलणाऱ्या पालकमंत्र्यांचा रूद्रावतार पाहून आढावा बैठकीचा नूरच बदलल्याचे समजते. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी मध्यस्ती करत प्रशासकीय मान्यता पूर्ण करण्याच्या सुचना देऊन वादावर पडता पाडल्याचे समजते. परंतु याची चर्चा सुरू झाली आहे.