चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल...महाविकास आघाडीचं प्रचंड शक्तीप्रदर्शन
प्रचंड शक्तीप्रदर्शन करीत महाविकास आघाडीने सांगली लोकसभा मतदारसंघासाठी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी व्यासपीठावरून बोलताना चंद्रहार पाटील यांनी मोदी सरकारवर प्रचंड टिका केली. तसेच सांगलीमध्ये वेगळं काय घडले अस ज्यांना वाटत आहे त्यांनी ते डोक्यातून काढून टाका असाही टोला महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या नेत्यांना दिला आहे.
संपुर्ण राज्याचे लक्ष लागून राहीलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघासाठी आज अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आपला उमेदवार चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी काढलेल्या रॅलीमध्ये महाविकास आघाडीने प्रचंड शक्तीप्रदर्शन करून महायुतीचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांना एकप्रकारे आव्हान दिले आहे.
या रॅलीसाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे स्वत: हजर होते. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनीही या रॅलीसाठी विषेश उपस्थिती लावली. तसेच जतचे काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत हे सुद्धा हजर होते. महाविकास आघाडीमधील जागावाटपावर नाराज असलेले काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी मात्र या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.
कानातून काढून टाका....
यावेळी संजय राऊत यांनी मोदी सरकारवर जोरदार टिका केली. मोदी सरकार म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी असून त्यांना हाकलून देण्याची सुरुवात सांगलीतून करायची आहे. सांगलीच्या खासदाराला तडीपारची नोटीस सांगलीची जनता देणार आहे. तसेच मी जयंत पाटील, काँग्रेसचे विश्वजित कदम, विक्रम सावंत यांचे आभार मानतो. सांगलीमध्ये महा विकास आघाडी एकत्र असल्याने सांगलीमध्ये यापुढे काही वेगळं घडणार आहे हे डोक्यातून काढून टाकण्याचा ईशाराही त्यांनी दिला आहे.
सगळ्यांचा रोख माझ्याकडे....
याच सभेमध्ये बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगलीमधील महाविकास आघाडी अंतर्गत सुरु असलेल्या जागा वाटपावर भाष्य केलं. सांगलीच्या उमेदवारीवरून सरगळ्यांचा रोख माझ्यावर होता. मात्र, माझा या जागावाटपाशी काहीही संबंध नाही. हा वाद उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस पक्षाचा आहे. आणि उद्धव ठाकरेंच्या एकदा डोक्यात आल्यास पुन्हा माघार नसते असे स्पष्टीकरण त्यांनी दिलं.