For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चंद्राबाबू चरणदास, तिसऱ्या आघाडीचे तीनतेरा

06:14 AM Aug 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
चंद्राबाबू चरणदास  तिसऱ्या आघाडीचे तीनतेरा
Advertisement

अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात त्यांच्या सरकारचे किंगमेकर बनलेले चंद्राबाबू नायडू यांची अवस्था सध्या अवघड झालेली आहे. आंध्रप्रदेशमध्ये ते सत्तेवर असले तरी त्यांना पुढील विधानसभा निवडणुकीची धास्ती वाटत आहे. अशावेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांचे स्तुतिपूजन करायला सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यात आंध्र प्रदेशमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात 2029 च्या लोकसभा निवडणुकीनंतर मोदीच पंतप्रधान होतील अशी घोषणा करून त्यांनी आपण भाजप आणि त्याच्या नेतृत्वाचे सर्वात मोठे पाईक आहोत असा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

Advertisement

याला जीवन ऐसे नाव, म्हणतात ना. त्यातीलच प्रकार. काळ इतक्या झपाट्याने बदलतो की कालचा ‘राव’ आज ‘रंक’ बनतो, कधीकधी देशोधडीला लागतो. राजकारणात फारसे वेगळे चित्र नाही. काल ‘बॉस’ असलेला माणूस आज रस्त्यावर येतो. त्याच्या हाती कटोरा असतो. काल ज्याच्यावर हुकूमत गाजवली होती त्याची हांजी, हांजी करतो. अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात त्यांच्या सरकारचे किंगमेकर बनलेले चंद्राबाबू नायडू यांची अवस्था सध्या अशीच अवघड झालेली आहे. आंध्रप्रदेशमध्ये ते सत्तेवर असले तरी त्यांना पुढील विधानसभा निवडणुकीची धास्ती वाटत आहे. अशावेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांचे स्तुतिपूजन करायला सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यात आंध्र प्रदेशमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात 2029 च्या लोकसभा निवडणुकीनंतर मोदीच पंतप्रधान होतील अशी घोषणा करून त्यांनी आपण भाजप आणि त्याच्या नेतृत्वाचे सर्वात मोठे पाईक आहोत असा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

मोदींना नायडू यांच्या शिफारशीची गरज नव्हती किंवा त्यांनी असं काही करावं असे त्यांना सांगितले गेले नव्हते अशावेळी नायडू यांनी आपल्याकडूनच ही घोषणा करून भाजपच्या सर्व मित्र पक्षात आपणच पंतप्रधानांच्या जवळचे आहोत असे सांगण्याचा डाव खेळला आहे. दक्षिण भारतात भाजपची डाळ शिजत नसताना मोदींचे दक्षिणेतील आपणच एकमेव मोठे सरदार आहोत असे दाखवण्याचा नायडू यांचा प्रयत्न दिसतो आहे. ताक मागायला गेलेल्याला भांडे लपवता येत नाही अगदी तसे. कोणी आपली स्तुती केली तर ती पंतप्रधानांना नको आहे असे नव्हे पण नायडू हे आता पूर्वीसारखे किंगमेकर राहिलेले नाहीत ते मोदी यांच्या दरबारातील एक दरबारी झाले आहेत, एक झेलकरी झाले आहेत. त्यांना मोदींना काही करून खुश करायचे आहे. त्याला कारणही तसेच आहे. आंध्रप्रदेशमध्ये दर पाच वर्षांनी सत्तापालट होत असतो, असा जवळजवळ नियम आहे. त्याला अपवाद नाही असे नाही. नायडू यांना काही करून 2029 मध्ये परत मुख्यमंत्री बनायचे आहे आणि त्याकरता मोदींना आत्तापासूनच खुश ठेवणे जरुरीचे आहे असे त्यांना वाटते. आंध्र प्रदेशातील राजकारण हे नायडू यांच्या तेलगू देशम आणि त्यांचे कट्टर राजकीय विरोधक वाय. एस. जगन मोहन रे•ाr यांचे काँग्रेस यांच्यामध्ये विभागले गेलेले आहे. मोदींनी जगन मोहन यांना आपला आशीर्वाद देऊ नये यासाठी ‘मला तुमचं म्हणा. मला तुमचं म्हणा’ असा नायडू यांचा लकडा आहे.

Advertisement

प्रादेशिक पक्ष म्हटले की घराणे आलेच. काही करून नायडू यांना आपला मुलगा नारा लोकेश याला राजकारणात स्थिरस्थावर करायचे आहे. एनटी रामा राव यांचा हा नातू आणि नायडू यांचा हा मुलगा फार ब्राईट नाही, त्यामुळे त्याच्या व्यक्तिमत्वाला उजाळा देणे सुरु आहे. पंतप्रधानांप्रमाणे नायडू यांनी देखील पंचाहत्तरी ओलांडली आहे आणि त्यामुळे नवीन पिढीला पुढे आणणे त्यांना भाग आहे. जगन मोहन यांच्यावर भ्रष्टाचाराचे बरेच आरोप असून देखील पंतप्रधानांनी त्यांच्याविरुद्ध भरीव अशी कोणतीच कारवाई केलेली नाही कारण त्यांना राज्याच्या राजकारणात त्यांचा उपयोग करून घ्यायचा आहे. दोन माकडांमधील भांडणात मांजराचा लाभ होतो ही गोष्ट नेता मंडळींना मनापासून माहित असते.

बिहारमधील बांकीपूर आणि मध्यप्रदेशमधील दतियाच्या पोटनिवडणूकांत भाजपचा पराभव होऊन पक्षापुढे एक संकट उभे होण्याच्या अगोदर नायडू यांनी मोदींच्या 2029 मधील दावेदारीची घोषणा करून स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे की कसे ते येणारा काळ दाखवेल. तात्पर्य काय उद्या नायडू परत टोपी बदलू देखील शकतात. 2029 पर्यंत कोण कोणाच्या बाजूने राहणार हे आत्ताच सांगणे महाकठीण आहे. आधुनिक महाभारताचा काळ सुरु झालेला आहे. तरुण पिढीच्या आंदोलनाने उडालेली खळबळ शांत होण्याची चिन्हे नाहीत. हैद्राबादच्या राष्ट्रीय विधी विद्यापीठात वादग्रस्त मुख्य न्यायाधीश सूर्य कांत यांना प्रमुख पाहुणे म्हणून दीक्षांत समारंभाला दिलेले निमंत्रण वादात आले आहे कारण विद्यार्थ्यांनी त्यांच्या हातून पदवी स्वीकारण्यास नकार दिलेला आहे.

नायडू यांच्या हातून वेळ सुटत चालला आहे. एकेकाळी ते तिसऱ्या आघाडीचे किंगमेकर होते. दिल्लीमधील त्यांच्या आंध्र भवनमध्ये देवेगौडा यांची गैर-काँग्रेस, गैर भाजप अशा संयुक्त आघाडीचे पंतप्रधान म्हणून निवड झाली होती. प्रादेशिक पक्षांचे एक मोठे कडबोळे बनवून काँग्रेस आणि भाजपला शह देत दिल्लीवर हुकूमत गाजवण्याची नायडू यांची मनीषा आणि महत्वाकांक्षा होती. संयुक्त आघाडीचे सरकार म्हणजे कुत्र्याची छत्री ठरली. महत्वाकांक्षी देवेगौडा यांचा 11 महिन्यात निकाल लागला तर त्यांच्यानंतर आलेले आय. के. गुजराल चार-पाच महिन्यात निपटले गेले. तिसऱ्या आघाडीचे सरकार म्हणजे तिसऱ्या दर्जाचे  (THIRD  क्लास ) सरकार ठरले.

नायडू यांचा राजकारणातील ऱ्हास हा गैर-भाजप आणि गैर काँग्रेस पक्षांची देशाच्या राजकारणातील घसरण दाखवते. प्रादेशिक पक्ष म्हणजे भारतीय राजकारणातील  ‘मूळ भाग’ (रिजिनल इज ओरिजिनल) हा लालू प्रसाद यादव यांचा सिद्धांत केव्हाच मागे पडला असून लालू यांचे सामाजिक न्यायाचे राजकारण देखील मागे पडत चालले आहे. बांकीपूरच्या पोटनिवडणूकीने एकीकडे मंडळचे कार्ड फिके पाडले तर दुसरीकडे कमंडलचे देखील. एकाच निकालाने एकीकडे भाजपचे डोळे फिरवले तर दुसरीकडे लालूंच्या राष्ट्रीय जनता दलाचे देखील. प्रशांत किशोर यांनी आपल्या विजयाने बिहारच्या राजकारणातच नव्हे तर एक प्रकारे राष्ट्रीय राजकारणात देखील एक पाचर मारली आहे.भाजपची गाडी फारशी ठीक चाललेली नसताना पंजाबमधील भाजपचा एकेकाळचा मित्रपक्ष शिरोमणी अकाली दल हा परत त्या पक्षाच्या जवळ येत चालला आहे. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणूकीत दोन्ही पक्षांची परत युती होईल अशी चर्चा सुरु झालेली आहे. गेल्या आठवड्यात अकाली दलाचे प्रमुख आणि माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांनी पंतप्रधानांची भेट घेतल्याने या चर्चेला गती मिळाली आहे. येत्या निवडणूकीत पंजाबमध्ये कोणत्याच पक्षाचे बहुमत आले नाही तर भाजपला हवेच आहे. त्रिशंकू विधानसभा आली की आपल्या पसंतीचे कुडमुडे सरकार बनवून दिल्लीतून राज्य करायचा त्याचा मानस आहे.

सुनील गाताडे

Advertisement
Tags :

.