कॅनडा पंतप्रधानपदाच्या शर्यतीत चंद्रा आर्या
मूळचे कर्नाटकचे : ट्रुडो अन् खलिस्तानी दहशतवादाचे विरोधक
वृत्तसंस्था/ ओटावा
कॅनडात जस्टिन ट्रुडो यांच्या पंतप्रधान पदाच्या राजीनाम्यानंतर लिबरल पार्टीचे हिंदू नेते चंद्रा आर्या यांनी पंतप्रधानपदासाठी दावा केला आहे. चंद्रा आर्या हे भारतीय वंशाचे कॅनडातील खासदार आहेत. ट्रुडो यांच्या राजीनाम्यानंतर लिबरल पार्टीत नवा नेता निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
चंद्रा आर्या यांनी स्वत:च्या दावेदारीची घोषणा केली आहे. चंद्रा हे पूर्वी जस्टिन ट्रुडो यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते, परंतु खलिस्तानी दहशतवाद आणि कट्टरवादासंबंधी ट्रुडो यांच्या भूमिकेनंतर आर्या त्यांचे कठोर टीकाकार ठरले होते. 6 जानेवारी रोजी जस्टिन ट्रुडो यांनी वाढत्या दबावादरम्यान पक्षनेतेपद अन् पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. तर त्यांच्या सरकारचा कार्यकाळ ऑक्टोबर महिन्यापर्यंत होता.
कॅनडाचा आगामी पंतप्रधान होण्यासाठी मी निवडणूक लढवत आहे. आमच्या देशाची पुनउ&भारणी आणि भावी पिढ्यांसाठी समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी अधिक कुशल सरकारचे नेतृत्व करण्याचा माझा विचार आहे. आम्ही महत्त्वपूर्ण संरचनात्मक समस्यांना सामोरे जात असून त्यावर तोडगा काढण्यासाठी कठीण पर्यायांची आवश्यकता भासणार असल्याचे चंद्रा आर्या यांनी म्हटले आहे.
कॅनडाला मजबूत नेतृत्वाची गरज
अनेक कॅनेडियन विशेषकरून युवापिढी समस्यांना सामोरी जात आहे. काम करणारा मध्यमवर्ग संघर्ष करत आहे. अनेक परिवार गरीब होत चालले आहेत. कॅनडाला आता कठोर निर्णय घेणारे नेतृत्व हवे आहे. हे निर्णय आमच्या अर्थव्यवस्थेला मजबूत करणारे असावेत. तसेच सर्व कॅनेडियन लोकांसाठी समान संधी निर्माण करणारे असावेत. विवेक अन् व्यावहारिकतेला स्वत:च्या मार्गदर्शक तत्त्वांच्या स्वरुपात अंगिकरात मी ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी आणि कॅनडाचा पंतप्रधान म्हणून नेतृत्व करण्यासाठी वाटचाल करत असल्याचे उद्गार आर्या यांनी काढले आहेत.
2006 साली कॅनडात स्थलांतर
चंद्रा आर्या हे मूळचे कर्नाटकच्या तुमकुरू येथील सिरा तालुक्याचे रहिवासी आहेत. 2006 मध्ये ते कॅनडात स्थायिक झाले होते. आर्या यांनी धारवाडच्या कौसली इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमधून एमबीए केले आहे. 2015 मध्ये त्यांनी पहिल्यांदा फेडरल निवडणूक लढवत कॅनडाच्या संसदेत प्रवेश केला होता. 2019 मध्ये ते दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते. कॅनडातील खलिस्तानी घटकांवर टीका करण्यासाठी ते ओळखले जातात.