पावसाचा जोर ओसरला! चांदोली धरणातून १२२८५ क्युसेक विसर्ग : वारणा नदीकाठच्या गावांना पुराचा वेढा कायम
वारणानगर / प्रतिनिधी
वारणा नदीचा जलसाठा असलेल्या वसंत सागर या चांदोली धरण क्षेत्रात अतिवृष्टीचा जोर ओसरला असून धरणातून १६९७६ क्यूसेकने नदीपात्रात सुरू केलेला विसर्गात सोमवारी सकाळी १०.३० वाजता ४६९१ क्युसेकने कपात करून तो १२६९१ क्युसेक कायम केल्याने नदीकाठच्या गावांना पुराचा वेढा अद्याप कायम राहिला असलातरी या कपातीने दिलासा मिळाला आहे.
चांदोली धरणातून नदी पात्रात मंगळवार दि.२३ पासून सुरू केलेल्या विसर्गात टप्या टप्याने वाढ करून सोमवार दि.२९ सकाळ पर्यंन्त १६९७६ क्यूसेक विसर्ग सुरू होता या विसर्गाने धरणातील पाणी साठा तीन दिवसात ३.२४ टिएमसी ने कमी झाला आहे अकरा दिवसात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊसाचा जोर कायम राहून आजवर २४३४ मि. मी पाऊस पडला होता. शनिवार पासून काही अंशी पाऊस उघडला असलातरी धरण क्षेत्रात सोमवार सकाळ पर्यन्त देखील ७५ मि.मी पाऊसाची नोंद झाली आहे. वारणा नदी काठच्या गावांना अद्याप महापूराचा वेडा कायम असून पाणी पातळीत चढ उतार होऊ लागला आहे.
चांदोली धरणाची पाणी साठवण क्षमता ३४.४० टीएमसी असून पाणी साठा २९.२९ टीएमसी होऊन धरण ८५.१३ टक्के भरले आहे. विसर्ग वाढविल्याने ३.२४ टिएमसी पाणी साठा कमी झाला आहे. जलाशय परिचालन सूची प्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रीत ठेवण्यासाठी धरणातून पाण्याचा विसर्ग चालू झाल्याने नदीकाठच्या दोन्ही बाजूची शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आली आहे.सद्या नदीपात्रात वीजनिर्मिती साठी १४०० व वक्र द्वारातून १०८८५ क्युसेक असा १२२८५ क्युसेक प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू असून तो कमी केल्याने महापुराचा धोका कमी होणार आहे.
वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊन पाणी पात्राबाहेर गेले असून इशारा पातळी ओलांडली आहे नदीकाठची शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली आहे. दरम्यान पावसाचा जोर कमी जास्त होईल त्यादृष्टीने धरणातील विसर्ग राखला जातो असे पाटबंधारे कोडोली उपविभागाचे सहा. अभियंता मिलींद किटवाडकर यांनी सांगितले.
वारणा परिसर जलमय : अनेक गावात पाणी शिरले,स्थलांतर सुरु
चांदोली धरण आणि नदीपात्रात गत दहा दिवसात पाऊसाचा जोर कायम राहिला यामुळे धरणातून वाढता पाण्याचा विसर्ग आणि पाऊसाचे नदी पात्रात जमा होणार पाणी यामुळे वारणा परिसर सर्वत्र जलमय झाला आहे. हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे तर अनेक गावात पाणी शिरल्याने तेथील कुटुंबाचे तसचे जनावरांचे स्थलांतर केले आहे.