Chandgad Crime News | चंदगड हादरले! तुर्केवाडीत महिला डॉक्टरवर अॅसिडसदृश द्रव्याने जीवघेणा हल्ला
तुर्केवाडीत महिला डॉक्टरवर अॅसिडसदृश हल्ला
चंदगड -तुर्केवाडी येथील एका महिला डॉक्टरवर अज्ञात दोघांनी असिडसदृश द्रव फेकून हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रणाली कौशल बांदिवडेकर (वय २९, व्यवसाय डॉक्टर, रा. तिलारी रोड, जनता हायस्कूलजबळ, तुकेवाडी) या कुद्रेमनी येथे ओमसाई समर्थ क्लिनिकमध्ये ऑगस्ट २०२३ पासून वैद्यकीय सेवा देत आहेत. दि. १७एप्रिल रोजी रात्री सुमारे ८.४५ वा. त्या नेहमीप्रमाणे हॉस्पिटलमधील काम आटोपून दुचाकीवरून घरी परतत होत्या.
रात्री सुमारे ९ च्या सुमारास गुरुकुल शाळेजवळ त्यांच्या पाठीमागून मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या दुचाकीसमोर गाडीआडवी लावून त्यांना अडवले. त्यानंतर त्यातील एकाने हातातील बाटलीतील अॅसिडसदृश द्रव त्यांच्या अंगावर फेकले.या हल्ल्यात बांदिवडेकर यांना अंगावर तीव्र जळजळ होऊ लागली. हल्लेखोरांनी त्यांना धमकी देत घटनास्थळावरून पळ काढला. परिसरात अंधार असल्यामुळे हल्लेखोरांचे चेहरे किंवा वाहन क्रमांक स्पष्ट दिसू शकले नाहीत. घटनेनंतर जखमी डॉक्टरनी पतीला फोन करून घटनास्थळी बोलावले व तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले.
या प्रकरणी त्यांनी चंदगड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून, पोलिसांनी अज्ञात आरोपींचा शोध सुरू केला आहे. या प्रकारामुळे चंदगड तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांकडून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी होत आहे.