For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चंदीगढ महापौरपद भाजपच्या खिशात

07:00 AM Jan 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
चंदीगढ महापौरपद भाजपच्या खिशात
Advertisement

उपमहापौरपदी काँग्रेस, मोठ्या प्रमाणात मते फुटली

Advertisement

वृत्तसंस्था/चंदीगढ

चंदीगढ महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाकडे बहुमत नसतानाही या पक्षाच्या उमेदवार हरप्रीत कौर बाबला यांनी महापौरपदासाठीची निवडणूक जिंकली आहे. बाबला यांनी आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांच्या युतीचा पराभव केला. मात्र, काँग्रेसचे उमेदवार जसबीरसिंग बंटी यांनी उपमहापौरपद मिळविण्यात यश मिळविले आहे. गुरुवारी या निवडणुका झाल्या. सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी पर्यवक्षकाची नियुक्ती केली होती. महापौरपदासाठीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमदेवार हरप्रीत कौर बाबला यांना 19 मते पडली.

Advertisement

तर आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांच्या युतीला 17 मतांवर समाधान मानावे लागले. वास्तविक या महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाच्या मतदानपात्र सदस्यांची संख्या 16 आहे. त्यामुळे युतीची सर्व मते युतीकडेच राहिली असती तर भारतीय जनता पक्षाला विजय मिळविणे अशक्य होते. मात्र, युतीच्या तीन सदस्यांची मते फुटल्याने भारतीय जनता पक्षाला विजय मिळविता आला आहे. ही निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने झाली. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षांतरबंदी कायदा लागू होत नाही. त्यामुळे आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांच्यापैकी नेमकी कोणत्या पक्षाची मते फुटली, हा आता चर्चेचा विषय झाला आहे. दोन्ही पक्षांनी एकमेकांवर आरोप केले आहेत.

उपमहापौरपद काँग्रेसकडे

महापौरपदाची निवडणूक झाल्यानंतर उपमहापौरपदासाठीही मतदान झाले. या निवडणुकीत काँग्रेसला यश मिळाले. या पक्षाचे उमेदवार जसबीरसिंग बंटी यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा पराभव केला. बंटी यांना 19 मते मिळाली. तर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला 17 मते मिळाली. या निवडणुकीतही युतीचे एक मत फुटल्याचे स्पष्ट झाले. तथापि, ते पुरेसे नव्हते.

खासदाराचेही मतदान

चंदीगढ महानगरपालिकेच्या निवडणुकीत या लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांनाही मतदान करण्याचा अधिकार होता. त्यामुळे त्यांनीही मतदान केले. त्यांच्या मतासह आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांच्या युतीची मतदार संख्या 20 होती. तथापी, भारतीय जनता पक्षाला युती महापौरपदासाठीच्या निवडणुकीत पराभूत करु शकली नाही.

पर्यवेक्षकाच्या निरीक्षणाखाली...

गेल्यावेळी या निवडणुकांसंबंधी वादंग निर्माण झाले होते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने यावेळी स्वत: निवडलेल्या पर्यवेक्षकाची नियुक्ती केली होती. तसेच संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रण करण्याचा आदेश दिला होता. या आदेशांच्या अनुसार पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश जयश्री ठाकूर यांनी पर्यवेक्षक म्हणून काम पाहिले. त्या शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाला या निवडणुकांचा अहवाल सादर करणार आहेत. व्हिडीओ चित्रणही या अहवालासह सर्वोच्च न्यायालयाला सादर केले जाणार आहे.

Advertisement
Tags :

.