चंदगड मतदारसंघ मंडलिकांना 1 लाख 1 हजारांचं मताधिक्य देईल- उद्योग मंत्री उदय सामंत
प्रा. संजय मंडलिक म्हणजे राज्यात सर्वाधिक विकास निधी आणणारा खासदार असून केंद्रातील एकही मंत्री नाही की ज्यांच्याकडून त्यांनी निधी आणला नाही. मंडलिक सर्वसामान्य जनतेचे नेते असून राजासारखे त्यांचे मन आहे. गेल्यावेळी 51 हजारांचे मताधिक्य देणाऱ्या चंदगड मतदारसंघाने यावेळी 1 लाख 1 हजार मताधिक्य देण्याचा निश्चय केला आहे. या भागासाठी कुठेही एमआयडीसी मागा, ती दिली जाईल. शेतकऱ्यांच्या काजूसाठी प्रति किलो 10 रुपये सरकारी अनुदान देण्याचा निर्णय झालेला असून त्यासाठी 350 कोटींची आर्थिक तरतूद करण्यात आली असल्याचे मनोगत राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. यशवंतनगर येथे आयोजित राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री हसन मुश्रीफ होते.
आमदार राजेश पाटील आपल्या भाषणात म्हणाले, सदाशिवराव मंडलिक खासदार झाल्यानंतरच चंदगडच्या विकासाला गती आली असून जंगमहठी सारखा प्रकल्प मार्गी लावण्यात त्यांचे योगदान आहे. मतदारसंघात 1200 कोटीचा विकास निधी आणण्यात खासदार संजय मंडलिक यांनीही मोठे सहकार्य केलेले आहे. पाटीलवाड्यात राहून प्रचाराची सूत्र हलवण्राया छ. युवराज संभाजी राजे यांना मोदीनी 800 कोटींचा विकास निधी दिला. त्यांनी या भागासाठी काय केले, असा प्रश्न करत केवळ शिकारीला येऊन माणसं जोडता येत नसल्याचे सांगून यावेळी करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय मतदार गप्प बसणार नसल्याचे सांगितले.
उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांनी चंदगड तालुक्यासाठी 68 कोटी रुपयांचा विकास निधी दिल्याचे सांगून गेल्या पन्नास वर्षात राजकीय नाट्या घडले नाहीत, तेवढी गेल्या पाच वर्षात घडली. नैसर्गिक संकटही याच काळात आली. विकास निधी आणण्यासाठी आपल्याला उद्धव ठाकरेंना सोडावे लागले. पुढच्या काळात आतापेक्षा दुप्पट निधी देण्याचे आश्वासन देत असून राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी विचाराने राजकारण आणि समाजकारण आपण करीत असून पुन्हा एकदा संधी देण्याचे आवाहन त्यांनी केले. जिह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, यापूर्वी कधीही एवढी विकास कामे झाली नव्हती. प्रत्येक गावात काम पोहचले आहे. 300कोटींचा नवा रस्ता होतोय.
केवळ विकास निधीसाठी तडजोड करावी लागली. राजेश पाटील आणि प्रा. संजय मंडलिक या दोघांनी केलेल्या कामाचा प्रा फेडण्यासाठी प्रा. संजय मंडलिकाना निवडून द्या, असे आवाहन हसन मुश्रीफ यांनी यावेळी केले. यावेळी जानबा चौगुले, दशरथ कुपेकर, अशोक पाटील, भरमाना गावडा, अनंत पाटील, राजेखान जमादार, जयसिंग चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करून प्रा. संजय मंडलिक यांना निवडून देण्याचे आवाहन केले. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष भिकू गावडे, चंदगडच्या नगराध्यक्ष प्राची काणेकर, अभिजीत पाटील -औरनाळकर, तानाजी गडकरी, संगीता पाटील, अल्बर्ट डिसोजा, मुन्नासाहेब नाईकवाडी, दयानंद काणेकर, परसू पाटील, अशोक देसाई, महाबळेश्वर चौगुले, प्रवीण वाटंगी, विठोबा गावडे, भीमराव चिमणे आदींची उपस्थिती होती. आभार अभयराव देसाई यांनी मानले.