सह्याद्रीच्या कुशीतला चंदगड सौर कुंपण योजनेपासून वंचित ? वन्यप्राण्यांच्या उपद्रवाने शेती उद्ध्वस्त; तालुक्याचा समावेश करण्याची शेतकऱ्याची मागणी
निवृत्ती हारकारे
कार्वे (कोल्हापूर) : सह्याद्रीच्या पश्चिम घाटाच्या कुशीत वसलेल्या चंदगड तालुक्याला निसर्गान समृद्ध वनसंपदा दिली. मात्र याच जंगलाच्या सान्निध्यात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर वन्यप्राण्यांच्या वाढत्या उपद्रवाचे गंभीर संकट उभे ठाकले आहे. उभ्या पिकांवर गये, रानडुकरे, हत्ती यांसह अन्य वन्यप्राण्यांचे कळप धडकत असल्याने शेतकऱ्यांची मोठी आर्थिक हानी होत आहे. अशा परिस्थितीत पिकांचे संरक्षण करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या सौर कुंपण योजनेत कोल्हापूर जिल्ह्याचा, विशेषतः चंदगड तालुक्याचा समावेश का नाही? असा सवाल आता शेतकरी वर्गातून उपस्थित होत आहे.
वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शासनाच्या स्तरावर सौर ऊर्जा कुंपणासारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्रोत्साहन दिले जात आहे. मात्र ऑनलाइन अर्ज प्रक्रियेत कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी या योजनेच्या लामापासून वंचित असल्याची स्थिती आहे. वन्यप्राण्यांचा सर्वाधिक वावर असलेल्या भागातील शेतकऱ्यांनाच योजनेच्या कक्षेबाहेर ठेवले जात असल्याने या योजनेच्या अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चंदगडची भौगोलिक परिस्थिती पाहता या मागणीचे गांभीर्य अधिक वाढते. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र असून चंदगड वनपरिक्षेत्रात सुमारे १३ हजार ८४६ हेक्टर वनक्षेत्र आहे. जंगल आणि मानवी वस्ती यांचा थेट संपर्क अनेक गावांमध्ये येतो.
परिणामी वन्यजीवांचा अधिवास आणि शेतीक्षेत्र यांच्यातील संघर्ष सातत्याने वाढताना दिसत आहे. गवे, रानडुकरे, हत्ती, बिबट्या, अस्वल यांसह विविध वन्यप्राण्यांकडून मात, ऊस, मका, नाचणी, काजू आदी पिकांचे नुकसान होत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. पाटणे व चंदगड वनपरिक्षेत्रात यापूर्वीही हत्ती व गव्यांकडून झालेल्या पिकांच्या नुकसानीची शेकडो प्रकरणे नोंदली गेली आहेत.
अलीकडे चिंचणे-कामेवाडी परिसरातही वन्यप्राण्यांच्या वावरामुळे शेतकऱ्यांना रात्री पिकांची राखण करण्याची वेळ आली आहे. शासनाच्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेत सौर ऊर्जा कुंपणाचा समावेश करण्यात आला आहे. अधिकृत माहितीनुसार पात्र भागातील लाभार्थ्यांना कुंपणाच्या किमतीच्या ७५ टक्के किंवा कमाल १५ हजार रुपये, यापैकी जी रक्कम कमी असेल, तेवढे अनुदान देण्याची तरतूद आहे. मानव-वन्यजीव संघर्ष कमी करून पिकांचे संरक्षण करणे हा या उपाययोजनेमागील प्रमुख उद्देश आहे. मात्र ज्या भागात वन्यप्राण्यांचा प्रत्यक्ष त्रास मोठ्या प्रमाणात आहे, त्याच भागातील शेतकरी योजनेच्या लाभापासून दूर राहणार असतील तर योजनेचा अपेक्षित उद्देश साध्य होणार कसा, असा सवाल उपस्थित होत आहे.
वन्यजीवांचे संरक्षण करतानाच जंगलालगतच्या शेतकऱ्यांच्या शेतीचे आणि जीविताचे संरक्षण करणेही तितकेच आवश्यक आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचा सौर कुंपण योजनेत तातडीने समावेश करून चंदगड तालुक्याला प्राधान्य द्यावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. सह्याद्रीचे जंगल आणि वन्यजीवांचे संरक्षण करताना त्याच्या कुशीत शेती करणाऱ्या शेतकऱ्याचे जगणेही सुरक्षित राहणे गरजेचे आहे.