चंदन गुप्ता हत्याकांड; 28 दोषींना जन्मठेप
50 हजारांचा दंड, एनआयए न्यायालयाचा निकाल : उत्तर प्रदेशातील कासगंज दंगलीवेळी गोळ्या झाडून हत्या
वृत्तसंस्था/ लखनौ
उत्तर प्रदेशातील कासगंज येथे 2018 मध्ये अभाविप (अखिल भारतीय विद्यार्थी परिषद) कार्यकर्ता चंदन गुप्ता याच्या हत्येप्रकरणी 28 दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. लखनौमधील एनआयए न्यायालयाचे न्यायमूर्ती विवेकानंद शरण त्रिपाठी यांनी शुक्रवारी हा निर्णय दिला. या प्रकरणात 2 जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान अन्य दोन आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.
चंदन गुप्ता हत्येप्रकरणी एनआयए विशेष न्यायालयाने आसिफ कुरेशी उर्फ हिटलर, अस्लम कुरेशी, असीम कुरेशी, शबाब, साकिब, मुनाजीर रफी, आमिर रफी, सलीम, वसीम, नसीम, बबलू, अक्रम, तौफिक, हसीन, राहत, सलमान, आसिफ जिमवाला, निशू, वासीफ, इम्रान, शमशाद, जफर, शाकीर, खालिद परवेझ, फैजान, इम्रान, शाकीर, जाहिद उर्फ जग्गा यांना कलम 147, 148, 307/149, 302/149, 341, 336, 504, 506 अंतर्गत दोषी ठरवण्यात आले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी 3 जानेवारीला त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच 50 हजार रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे.
26 जानेवारी 2018 रोजी तिरंगा यात्रेदरम्यान चंदन गुप्ता यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तेव्हापासून आजपर्यंत चंदनच्या कुटुंबीयांनी दीर्घ कायदेशीर लढा दिल्यानंतर शुक्रवारी त्यांना शिक्षा जाहीर झाली. 2018 मध्ये घडलेल्या हत्येच्या घटनेनंतर राज्यातील वातावरण तापले होते. कासगंज हिंसाचाराच्या ज्वाळांनी पेटले होते. याप्रकरणी पोलिसांनी वसीम, नसीम, सलीम या तीन मुख्य आरोपींसह 100 हून अधिक जणांना अटक केली होती.
तपासानंतर कासगंज पोलिसांनी 26 एप्रिल 2018 रोजी एकूण 30 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. यातील एकूण 28 आरोपींपैकी एक आरोपी मुनाजीर रफी आधीच तुरुंगात आहे. मुनाजीर रफी हा कासगंजच्या वकील मोहिनी तोमर हत्या प्रकरणात तुरुंगात आहे. एनआयए न्यायालयाने आरोपी नसरुद्दीन आणि असीम कुरेशी या दोघांची सढळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. यासोबतच अजीजुद्दीन नावाच्या आरोपीचा सुनावणीदरम्यान मृत्यू झाला आहे.