चंदा कोचर यांना सीबीआय कोठडी
मुंबई / वृत्तसंस्था
आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक यांना तीन दिवसांची सीबीआय कोठडी देण्यात आली आहे. त्यांना शुक्रवारी कर्ज घोटाळा केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. शनिवारी त्यांना मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयात उपस्थित करण्यात आले. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली. अवैध मार्गाने कर्ज दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
त्यांनी वेणुगोपाल धूत यांच्या व्हिडीओकॉन या कंपनीसमूहाला नियमबाहय़ पद्धतीने कर्ज दिल्याचा आरोप आहे. सीबीआयने काही दिवसांपूर्वी या प्रकरणात धूत यांची चौकशी केली होती. त्यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनंतर कोचर आणि त्यांचे पती यांना अटक करण्याचा निर्णय घेण्यात आला अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. काही वर्षांपूर्वीच हा कथित कर्ज घोटाळा बाहेर पडला होता. तथापि, आता त्याच्या चौकशीला प्रारंभ करण्यात आला आहे.