तीन दिवस पावसाची शक्यता
पणजी : मान्सूनने अखेर गोव्यातून काढता पाय घेतला. मात्र आजपासून तीन दिवस गोव्यात सर्वत्र मेघगर्जनेसह मध्यम तथा हलक्या स्वरूपात पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने अखेर गोव्यातून मान्सूनने माघार घेतल्याचे सायंकाळी जाहीर केले. 14 सप्टेंबरपासून राजस्थानमधून मान्सूनने माघार घेण्यास प्रारंभ केला होता. गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड इत्यादी भागातून हळूहळू माघार घेताना महाराष्ट्रातील काही भागांमधूनही मान्सूनने गेल्या चार दिवसात माघार घेतली. शेवटच्या टप्प्यात सोमवारी महाराष्ट्राच्या उर्वरित भागातून त्याचबरोबर गोव्यातूनही मान्सूनने माघार घेतली. गोव्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला तसेच देशभरात सर्वत्र जोरदार पाऊस झाला. मान्सूनने माघार घेतल्यानंतर आज 14 ऑक्टोबरपासून पुढील तीन दिवस सर्वत्र मध्यम तथा हलक्या स्वरूपात गडगडाटासह पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. यंदा मोसमी पावसाने इंचाचे सव्वाशतक पूर्ण केले. दिवाळीत पावसाची शक्यता आहे. आजपासून पुन्हा ढगाळ हवामान गोव्यात शक्य आहे.