आज मुसळधार पावसाची शक्यता
पणजी : गोव्यात पावसाचे प्रमाण प्रत्यक्षात मोसम सुरू झाल्यानंतर कमी झाले, मात्र आज 3 जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता असून हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. 1 जून रोजी पावसाचा अधिकृत मोसम हवामान खात्यानुसार सुरू झाला आहे. तत्पूर्वी बिगर मोसमी पाऊस 26 इंच झालेला आहे. 1 जूनपासून एक इंच झाला आहे. गेल्या 24 तासात गोव्यात सरासरी पाऊण इंच पाऊस पडला, तर मोसमातील पाऊस एक इंच झाला आहे. काल सोमवारी कडक ऊन पडले आणि पाऊस गायब झाला. सायंकाळी गोव्याच्या काही भागात पाऊस पडला. दुपारी पणजी, फोंडा भागात मध्यम प्रमाणात पाऊस पडला. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासात राज्यात काही भागात मध्यम तर काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान रविवार व सोमवारी तापमान बरेच वाढले आणि उकाडा असह्य होऊ लागला. मात्र सायंकाळी पडलेल्या पावसामुळे हवेत पुन्हा गारवा जाणवला. येत्या आठ जूनपर्यंत गोव्यात पावसाचे प्रमाण फारच कमी राहील, हवामान खात्याने तशी माहिती दिली.