आज जोरदार पावसाची शक्यता
हवामान खात्याकडून तीन दिवस येलो अलर्ट
पणजी : गोव्यातील विविध भागात मंगळवारी पावसाने हजेरी लावली. पुढील 24 तासांत जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने तीन दिवस येलो अलर्ट जारी केला आहे. ऐन श्रावण महिन्यात पावसाचे प्रमाण यंदा फारच ओसरले असून गेले 4 दिवस ढगाळ हवामान आहे. त्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी आहे. मंगळवारी गोव्याच्या विविध भागात पाऊस पडला. आज बुधवारी जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज आहे. सध्या गोव्यात सर्वत्र तुरळक पाऊस पडत आहे. काही भागात जोरदार पद्धतीने तो पडून जातो. बदलत्या हवामानाप्रमाणे पावसाचे प्रमाण कमी अधिक होत आहे. यंदा ऐन गणेशचतुर्थी उत्सव काळात जोरदार पावसाची शक्यता आहे.
गेल्या 24 तासांमध्ये गोव्यात सरासरी 4.6 मी.मी. एवढा अत्यल्प पाऊस पडला. यंदाचा पाऊस हा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात 5 टक्के अधिक होता मात्र आता ऑगस्टचा तिसरा आठवडा सुरु होत आहे आणि पावसाचे प्रमाण एवढे कमी झालेले आहे की वार्षिक सरासरीच्या तुलनेत ते 11 टक्क्यांनी घटलेले आहे. गेल्या 24 तासांमध्ये सर्वाधिक अर्धा इंच पाऊस हा फोंडा येथे पडला. पणजी, मडगाव, दाबोळी, काणकोण, मुरगाव, केपे, धारबांदोडा, सांगे व जुने गोवे या सर्व केंद्रांवर तुरळक पावसाची नोंद झाली. मंगळवारी सकाळी व काही भागात दुपारनंतर बऱ्या प्रमाणात पाऊस पडला.