आज मुसळधार पावसाची शक्यता
ऑरेंज अलर्ट जारी : वाऱ्याचा वेग ताशी 40 वरून 50 किलोमीटरपर्यंत राहण्याचा अंदाज
पणजी : मान्सून सक्रिय झाल्याने राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला असून तुफान पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. शुक्रवारी राज्य सरकारने मुसळधार पावसाची शक्यता विचारात घेऊन सुट्टी दिली होती, प्रत्यक्षात पावसाचे प्रमाण फार कमी राहिले आणि चक्क सूर्यदर्शनही अनेक भागात झाले. आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने गुऊवारी ऑरेंज अलर्ट जारी केला आणि शुक्रवारी देखील नव्याने शनिवारकरिता ऑरेंज अलर्ट जारी केला. गोव्याच्या आसपास सर्वत्र कमी दाबाचा पट्टा असून त्यामुळे गोव्यात आज मुसळधार पाऊस पडेल. शुक्रवारी मात्र गुऊवारच्या तुलनेत पावसाचे प्रमाण फार कमी होते.
गेल्या 24 तासात धारबांदोडा येथे चार इंच पाऊस पडला. सांगे येथे जवळपास तेवढाच पाऊस पडला, तर केपे येथे तीन इंच, पणजीत अडीच इंच, फोंड्यात आणि दाबोळी येथेही अडीच इंच पावसाची नोंद झाली. मडगावात सव्वा दोन इंच, जुने गोवे, काणकोण, पेडणे येथे प्रत्येकी दोन इंच पाऊस पडला. वाळपई, मुरगाव व सांखळी येथे प्रत्येकी दीड इंच पावसाची नोंद झाली. म्हापसा येथे सव्वा इंच पाऊस झाला. पुढील 24 तासात गोव्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडणार आहे. त्यापुढील पाच दिवसासाठी येलो अलर्ट जारी असून या दरम्यान काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. पुढील काही दिवस व्रायाचा वेग ताशी 40 वरून 50 किलोमीटरपर्यंत पुढे जाईल.
यंदाच्या मोसमातील पाऊस 43 इंच
गेल्या 24 तासात दक्षिण गोव्यात उत्तर गोव्याच्या तुलनेत जास्त पाऊस आला. गोव्यात सरासाठी सव्वा दोन इंच पाऊस पडला. यामुळे यंदाच्या मोसमतील एकूण पाऊस आता 43 इंच झाला आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत तो दोन पूर्णांक दोन टक्क्यांनी अतिरिक्त ठरला आहे.