‘चॅम्पियन्स’ मोहीम फत्ते मोहीम फत्ते
फायनलमध्ये न्यूझीलंडवर मिळवला ऐतिहासिक विजय : सामनावीर रोहित शर्माची 76 धावांची निर्णायक खेळी
वृत्तसंस्था/ दुबई
सामनावीर रोहित शर्माने शुभमन गिलसोबत रचलेला भक्कम पाया, मध्यफळीत श्रेयस अय्यरने अक्षर पटेलसह केलेली उपयुक्त खेळी आणि हार्दिक, केएल राहुल यांच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा पराक्रम केला. दुबईच्या मैदानात शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात किवींनी कडवी टक्कर दिली, पण मजबुत इराद्यासह मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने 25 वर्षाचा हिशोब चुकता करत जेतेपदाला गवसणी घातली. विशेष म्हणजे, भारतीय संघाने विक्रमी तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे.
दुबईतील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 7 बाद 251 धावा केल्या. यानंतर भारताने विजयासाठीचे लक्ष्य 49 षटकांत 6 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. या विजयासह भारताने तब्बल 12 वर्षानंतर पुन्हा चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद पटकावले आहे. तसेच रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा भारताचा तिसरा कर्णधार ठरला आहे. यापूर्वी भारताने 2002 मध्ये सौरव गांगुली व 2013 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात जेतेपद मिळवले होते. अर्थात, या ऐतिहासिक विजयासह चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक तीन वेळा जेतेपद जिंकणारा भारत पहिला देश ठरला आहे. यानंतर ऑस्ट्रेलियाने दोनवेळा या स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे.
भारतीय संघ चषकासह मालामाल
न्यूझीलंडला नमवत चॅम्पियन्स ट्रॉफी पटकावणाऱ्या विजेत्या भारतीय संघाला 19.5 कोटी रुपये इतकी रक्कम मिळणार आहे. तर अंतिम फेरीत पराभूत झालेल्या उपविजेत्या न्यूझीलंडला संघाला 9.75 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळेल. याशिवाय, उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेला प्रत्येकी 4.85 कोटी रुपये दिले जातील. स्पर्धेत पाचव्या आणि सहाव्या स्थानावर असलेल्या संघांना 3 कोटी रुपये, तर सातव्या आणि आठव्या स्थानावर असलेल्या संघांना 1.2 कोटी रुपये बक्षीस दिले जाणार आहे.
रोहित शर्माचे अर्धशतक ठरले खास
भारताचा कर्णधार रोहित रोहित शर्माने 76 धावांची खेळी करत आयसीसी स्पर्धांतील 9 अंतिम सामन्यात पहिले अर्धशतक झळकावले आहे. 18 वर्षांच्या कारकिर्दीत आयसीसी स्पर्धेचे 8 अंतिम सामने खेळले होते. परंतु, त्याला या आठही सामन्यांमध्ये एकही अर्धशतक करता आले नव्हते. पण, आजच्या सामन्यात सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत रोहितने नवव्या अंतिम सामन्यात पहिले अर्धशतक केले. रोहितच्या या धमाकेदार खेळीच्या जोरावर भारताने नऊ महिन्यात आयसीसीच्या दुसरी महत्वाची स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला.