For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चंपाई यांच्यावर झारखंड सरकारकडून पाळत

07:00 AM Aug 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
चंपाई यांच्यावर झारखंड सरकारकडून पाळत
Advertisement

आसामचे मुख्यमंत्री शर्मा यांचा मोठा आरोप

Advertisement

वृत्तसंस्था/रांची 

झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन हे 30 ऑगस्ट रोजी भाजपमध्ये सामील होणार आहेत. याची घोषणा आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनीच सर्वप्रथम केली होती. या पार्श्वभूमीवर शर्मा यांनी आता एक मोठा दावा केला आहे. चंपाई सोरेन यांच्यावर मागील 5 महिन्यांपासून त्यांच्याच सरकारकडू पोलिसांद्वारे पाळत ठेवली जात होती. चंपाई यांच्यावर पाळत ठेवणाऱ्या झारखंड पोलीस विभागाच्या विशेष शाखेच्या दोन उपनिरीक्षकांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. एखाद्या नेत्यावर पाळत ठेवण्याचे भारतीय राजकारणातील हे दुर्लभ प्रकरण आहे. आम्ही हे प्रकरण सर्वोच्च स्तरापर्यंत उपस्थित करणार आहोत.

Advertisement

दोन्ही पोलीस उपनिरीक्षकांना घटनात्मक पदावर बसलेला एक व्यक्ती आणि विशेष शाखेच्या प्रमुखाकडून चंपाई सोरेन यांच्यावर पाळत ठेवण्याचे आदेश मिळाले होते. दोन्ही पोलीस उपनिरीक्षकांची आता दिल्ली पोलिसांकडून पुढील चौकशी केली जात असल्याचे शर्मा यांनी सांगितले आहे. दोन्ही पोलीस उपनिरीक्षक हे चंपाई सोरेन यांच्या फ्लाइटमधूनच कोलकात्यातून दिल्लीत दाखल झाले होते. तसेच त्यांनी ताज हॉटेलमध्येच रुम बुक केली होती. दोन्ही अधिकारी चंपाई सोरेन यांची छायाचित्रे काढत त्यांच्या हालचाली टिपत होते. दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर ते सर्वप्रथम आपण पत्रकार असल्याचा दावा करत होते, परंतु चंपाई यांनी त्यांच्या विरोधात तक्रार नोंदविली होती.

हनी ट्रॅपचा कट शक्य

चंपाई सोरेन यांचा फोन टॅप करण्यात आला असावा. तसेच त्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकविण्याचा कट असू शकतो, कारण एक महिला देखील दोन्ही पोलीस उपनिरीक्षकांच्या संपर्कात होती. चंपाई सोरेन यांनी भाजपसोबत चर्चा केल्यापासून त्यांच्यावर पाळत ठेवली जात होती असा दावा हेमंत विश्व शर्मा यांनी केला आहे.

भाजप प्रवेश करणार

माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा मंगळवारी केली होती.  त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. चंपाई सोरेन हे अद्याप झारखंड मुक्ती मोर्चात कार्यरत आहेत. चंपाई यांना अलिकडेच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले होते. झामुमोचे नेते हेमंत सोरेन यांना आपला अपमान केल्याचा दावा चंपाई यांनी केला आहे. चंपाई सोरेन हे झारखंडमधील दिग्गज आदिवासी नेते असल्याने भाजपला त्यांच्या प्रवेशाचा मोठा लाभ होणार आहे.

Advertisement
Tags :

.