For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजपमध्ये सामील होणार चंपई सोरेन

06:42 AM Aug 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
भाजपमध्ये सामील होणार चंपई सोरेन
Advertisement

30 ऑगस्ट रोजी होणार पक्षप्रवेश

Advertisement

वृत्तसंस्था/ रांची

झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी भाजप प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. राजकारणातून संन्यास स्वीकारण्याचा किंवा नवी संघटना निर्माण करण्याचा मी विचार केला होता. परंतु वेळेअभावी असे करता आले नाही. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर असलेल्या विश्वासामुळे भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. जनतेने देखील भाजपमध्ये प्रवेशासाठी समर्थन दिल्याचा दावा चंपई सोरेन यांनी मंगळवारी केला आहे.

Advertisement

झारखंडचे माजी मुख्यमंत्री सोरेन हे 30 ऑगस्ट रोजी भाजपमध्ये सामील होऊ शकतात. तत्पूर्वी सोमवारी रात्री सोरेन यांनी  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान आसामचे मुख्यमंत्री तसेच झारखंडचे भाजप प्रभारी हेमंत विश्व शर्मा उपस्थित होते.

शर्मा यांनी स्वत:च्या एक्स हँडलवर पोस्ट करत यासंबंधी माहिती दिली आहे. यात चंपई सोरेन हे रांची येथे 30 ऑगस्ट रोजी आयोजित होणाऱ्या सोहळ्यात भाजपमध्ये सामील होतील असे म्हटले गेले आहे. चंपई सोरेन यांच्यासोबत त्यांचा पुत्र देखील भाजपमध्ये सामील होणार आहे.

झामुमो नेतृत्वावर नाराज

मुख्यमंत्रिपदावरून हटविण्यात आल्याने चंपई सोरेन हे झामुमोच्या नेतृत्वावर नाराज होते. हेमंत सोरेन यांनी ईडीकडून अटक होण्यापूर्वी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. तर स्वत:च्या जागी त्यांनी चंपई सोरेन यांना मुख्यमंत्री केले होते. परंतु हेमंत सोरेन यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर झाल्यावर त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री होण्याचा निर्णय घेतला होता. याकरता चंपई सोरेन यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या घडामोडींमुळे चंपई सोरेन हे नाराज झाले आहेत.  झामुमो नेतृत्वाने अपमानित केल्याचा आरोप चंपई सोरेन यांनी केला होता.  यातूनच चंपई सोरेन यांनी झारखंडच्या कोल्हन क्षेत्रातील स्वत:च्या समर्थकांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या.

भाजपसाठी लाभदायक

लोकसभा निवडणुकीत भाजपने राज्यातील 5 राखीव मतदारसंघ गमाविले होते. या निवडणुकीत केंद्रीय मंत्री राहिलेले अर्जुन मुंडा यांनाही पराभव पत्करावा लागला होता. आदिवासी पट्ट्यात भाजपला मोठा फटका बसला होता. परंतु चंपई सोरेन हे पक्षात येणार असल्याने भाजपला या भागात मोठा लाभ होणार असल्याचे मानले जात आहे. नोव्हेंबर महिन्यात झारखंडमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे.

Advertisement
Tags :

.