झारखंड मुख्यमंत्रिपदी चंपई सोरेन झारखंडचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली शपथ
काँग्रेस-आरजेडीच्या प्रत्येकी एकानेही घेतली शपथ
वृत्तसंस्था/ रांची
चंपई सोरेन झारखंडचे 12 वे मुख्यमंत्री बनले आहेत. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. चंपई सोरेन यांच्यासोबतच काँग्रेसचे आलमगीर आलम आणि आरजेडीचे सत्यानंद भोक्ता यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. चंपई सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री असू शकतात, असे बोलले जात आहे. आता सरकारला 10 दिवसात बहुमत सिद्ध करावे लागेल. शपथविधीनंतर सर्व आमदार चार्टर्ड विमानाने हैदराबादला पोहोचले आहेत.
जमीन घोटाळ्यात हेमंत सोरेन यांना अटक झाल्यानंतर चंपई सोरेन मुख्यमंत्री बनले आहेत. हेमंत सोरेन यांनी बुधवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर राज्यातील राजकीय संकट अधिक गडद झाले होते. त्यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन मुख्यमंत्री होऊ शकतील, अशी अटकळ बांधली जात होती, परंतु कुटुंबातील आक्षेपांनंतर झामुमोच्या बैठकीत चंपई सोरेन यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. हेमंत सोरेन यांच्या सर्वात खास व्यक्तींपैकी ते एक आहेत. आता त्यांनी झारखंडचे 12 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. चंपई सोरेन यांच्यासह आघाडीच्या इतर नेत्यांनी बुधवारी रात्री राज्यपालांची भेट घेतल्यानंतर शपथविधीसाठी शुक्रवारचा दिवस निश्चित करण्यात आला होता.
चंपई सोरेन : ‘झारखंड टायगर’ अशी ओळख
चंपई सोरेन यांनी यापूर्वी राज्याचे परिवहन मंत्री म्हणून धुरा सांभाळलेली आहे. त्यांना जेएमएम प्रमुख शिबू सोरेन यांचे विश्वासू मानले जातात. 1990 च्या दशकात वेगळ्या (झारखंड) राज्यासाठी दीर्घ लढ्यात दिलेल्या योगदानासाठी ‘झारखंड टायगर’ म्हणून ओळखले जाते. चंपई सोरेन यांनी 1991 मध्ये सेराईकेला मतदारसंघातून पोटनिवडणुकीत अपक्ष आमदार म्हणून निवडून येऊन आपल्या राजकीय कारकिर्दीला सुऊवात केली होती. त्यांचे शिक्षण केवळ दहावीपर्यंत झाले आहे. 2019 मध्ये चंपई यांनी आपली मालमत्ता 2.55 कोटी ऊपये असल्याचे घोषित केले होते.
आलमगीर आलम काँग्रेसचे मंत्री
चंपई सोरेन यांच्याशिवाय काँग्रेस पक्षाचे आलमगीर आलम यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. आलमगीर आलम हे पाकूर मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार आहेत. 70 वषीय आलमगीर यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी 2019 मध्ये आपली मालमत्ता 7.02 कोटी रुपये असल्याचे जाहीर केले होते
राजदचे सत्यानंद भोक्ता हेही मंत्री
राजद नेते सत्यानंद भोक्ता यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. सत्यानंद हे चतरा मतदारसंघातून आरजेडीचे आमदार आहेत. झारखंड सरकारमध्ये ते कृषी मंत्री होते. मागील सरकारमध्ये ते कामगार मंत्री होते. 53 वषीय सत्यानंद यांनी दहावीपर्यंतच शिक्षण घेतले आहे. 2019 मध्ये त्यांनी आपली मालमत्ता 77.58 लाख घोषित केली होती.
झारखंडमधील पक्षीय बलाबल
81 सदस्यीय झारखंड विधानसभेत सत्ताधारी आघाडीचे 48 आमदार आहेत. यामध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचे 29, काँग्रेसचे 17, आरजेडी आणि सीपीआयचे प्रत्येकी एक-एक आमदार आहेत. तर विरोधी पक्ष एनडीएकडे 32 आमदार आहेत. यामध्ये भाजप 26, एजेएसयु 3, एनसीपी 1 आणि 2 अपक्ष आमदारांचा समावेश आहे. तसेच एक जागा रिक्त आहे. पक्षीय बलाबल सध्या महाआघाडीच्या बाजूने असले तरी काही आमदार आपल्या बाजुला झुकल्याने चंपई सोरेन विश्वासदर्शक ठराव जिंकू शकणार नाहीत, असा दावा भाजप नेत्यांनी केला आहे.