भातकांडे स्कूलसमोरील चेंबर धोकादायक
बेळगाव : कपिलेश्वर कॉलनी मेन रोडवरील भातकांडे शाळेसमोरून जाणाऱ्या ड्रेनेजचे चेंबर उघडे पडले आहे. गेल्या चार दिवसांपासून चेंबरवर झाकण नसल्याने या मार्गावरून ये-जा करणाऱ्या शाळकरी विद्यार्थी, वाहनचालक, पादचाऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. त्यावर झाडाच्या तात्पुत्या फांद्या टाकण्यात आल्या असल्या तरी धोकादायक चेंबरवर झाकण बसविण्याकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्याने संताप व्यक्त केला जात आहे. भातकांडे शाळेसमोरून जाणाऱ्या रस्त्यावरून वाहनांची नेहमी वर्दळ असते. तसेच शालेय विद्यार्थीदेखील सातत्याने ये-जा करीत असतात. मात्र गेल्या काही महिन्यापासून तेथील ड्रेनेज चेंबरवरील झाकणे वारंवार खराब होत आहेत. याबाबत महापालिकेकडे अनेकवेळा तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
एखादी दुर्घटना घडल्यानंतरच मनपाला जाग येणार का?
गेल्या काही दिवसापासून मुख्य रस्त्यावरील ड्रेनेज चेंबरवरील झाकण गायब झाले आहे. परिणामी धोकादायक चेंबरचा अंदाज येत नसल्याने वारंवार वाहन अपघात घडत आहेत. दिवसा तसेच रात्रीच्यावेळी चेंबरमध्ये वाहने अडकण्याचे प्रकारही घडत आहेत. तरीही याकडे महापालिकेने दुर्लक्ष केले असून, एखादी दुर्घटना घडल्यानंतरच मनपाला जाग येणार का? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.