भाजपच्या ‘बिनविरोध’ला आव्हान
राज्यातील 67 नगरसेवकांविरोधात हायकोर्टात याचिका : याचिकेवर लवकरच सुनावणी : मनसे, काँग्रेसने दार ठोठावले
मुंबई, दि. 5 (प्रतिनिधी) :
राज्यातील महापालिका निवडणुकीत सत्ताधारी पक्षाच्या 67 नगरसेवक बिनविरोध निवडीवरून राजकारण चांगलेच तापले आहे. हा मुद्दा उच्च न्यायालयात पोहोचला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाण्यातील नेते अविनाश जाधव आणि काँग्रेसचे कार्यकर्ते समीर गांधी यांनी यासंदर्भात थेट हायकोर्टाचे दार ठोठावलत रिट याचिका दाखल केल्या आहेत. बिनविरोध निवड जाहीर केलेल्या प्रभागांतील अर्ज मागे घेण्याच्या संशयास्पद प्रक्रियेची स्वतंत्रपणे चौकशी करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाला द्या, अशी विनंती याचिकेतून केली आहे. याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.
राज्याच्या अनेक महापालिकांच्या क्षेत्रात उमेदवार बिनविरोध निवडून आणण्यासाठी बेकायदेशीर कृत्यांचा अवलंब करण्यात आला आहे. राजकीय दबाव, धमकी आणि पैशांचे वाटप करून विरोधी उमेदवारांना त्यांचे अर्ज मागे घेण्यास भाग पाडण्यात आले आहे, असा आरोप याचिकामध्ये करण्यात आले आहे. नुकत्याच घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांनच्या निवडणुकीत कल्याण-डोंबिवली, पिंपरी -चिंचवड, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर या जिह्यांत सत्ताधारी पक्षाचे मोठ्या संख्येने उमेदवार बिनविरोध निवडून आणल्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले आहे. जाधव आणि गांधी यांच्यावतीने अॅड. असिम सरोदे यांच्या मार्फत याचिका दाखल केल्या आहेत.
निवडणुकीच्या निकालाला स्थगिती द्यावी
ज्या ज्या ठिकाणी संशयास्पदरित्या उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, तेथील परिस्थितीची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, त्या चौकशीवर उच्च न्यायालयाची देखरेख असावी, बिनविरोध निवडीसाठी विशिष्ट मतसंख्या निश्चित करीत सरकारने कायद्यात आवश्यक ती सुधारणा करावी, तसेच कथित बिनविरोध निवडणूक घोळाची स्वतंत्ररित्या सखोल चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित प्रभागांतील निवडणुकीच्या निकालाला स्थगिती देण्यात यावी, अशा विविध मागण्या याचिकेतून करण्यात आल्या आहेत.
67 उमेदवार बिनविरोध
राज्यात 29 महापालिका निवडणुकांमध्ये 67 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यात कल्याण डोंबिवलीत महायुतीचे सर्वाधिक भाजपच्या 15 तर शिवसेनेच्या 7 अशा 22 उमेदवारांचा समावेश आहे. जळगावमध्ये 12 जण बिनविरोध निवडून आले. त्यात भाजप आणि शिवसेनेचे प्रत्येकी 6-6 उमेदवारांचा समावेश आहे. तर भिवंडीत भाजपचे 6 तर शिवसेनेचे 2 असे 8 उमेदवार बिनविरोध विजयी झाले. तसेच ठाण्यात शिवसनेचे 7, पनवेलमध्ये भाजपचे 6 तर अपक्ष 1 असे सात उमेदवार बिनविरोध निवडून आले. अहिल्यानगरमध्ये भाजपचे 3 तर राष्ट्रवादीचे 2 असे पाच उमेदवार विजयी झाले. तर धुळ्यात भाजपचे चार उमेदवार विजयी झालेत. तर पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे प्रत्येकी दोन उमेदवार विजयी झाले आहेत. मालेगावमध्ये इस्लामिक पार्टीचा एक उमेदवार विजयी झाला आहे.
सर्व उमेदवारांच्या निवडीमागे सत्ताध़ाऱ्यांचा राजकीय दबाव, धमकी कारणीभूत असल्याचा दावा याचिकेत केला आहे. या प्रकरणात उच्च न्यायालय कोणता निर्णय देतेय, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.