इतिहास घडवू पाहणाऱ्या भारतासमोर चीनचे आव्हान
वृत्तसंस्था/काकामिगाहारा
आज शुक्रवारी इतिहास घडवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघासमोर चीनचे महाकाय आव्हान असेल. आशियाई क्रीडा स्पर्धेत 44 वर्षांनंतर पहिले सुवर्णपदक जिंकण्याच्या आणि लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी थेट पात्रता मिळवण्याच्या ध्येयाने भारतीय संघ अंतिम सामन्यात गतविजेत्या चीनचा सामना करणार आहे. 1982 च्या स्पर्धेत मिळालेल्या एकमेव विजयानंतर भारताने महिला हॉकीमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकलेले नाही. मात्र हा संघ आता हा प्रदीर्घ प्रतीक्षा काळ संपवण्यासाठी सज्ज दिसत आहे.
1982 मधील त्या ऐतिहासिक विजयानंतर भारताने दोनदा हे विजेतेपद पुन्हा मिळवण्याच्या दिशेने मजल मारली होती. 1998 आणि 2018 मध्ये संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचला, पण अनुक्रमे दक्षिण कोरिया आणि जपानकडून पराभव पत्करावा लागल्याने त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. आता मात्र एका नवीन पिढीसमोर ही प्रदीर्घ प्रतीक्षा संपवण्याची आणि आशियाई स्तरावर भारताला पुन्हा एकदा अव्वल स्थानावर नेण्याची संधी आहे. संघाचा आत्मविश्वास त्यांच्या अलीकडील उत्कृष्ट कामगिरीतून दिसून येतो. भारताने या वर्षाच्या सुऊवातीला ‘एफआयएच नेशन्स कप’ जिंकला आणि त्यानंतर बेल्जियम व नेदरलँड्समध्ये झालेल्या विश्वचषकात 52 वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी करत पाचवे स्थान पटकावले.