दीपक, नरेंदरचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त
वृत्तसंस्था/ बुस्टो अॅरसिझीओ (इटली)
येथे सुरू झालेल्या पहिल्या विश्व ऑलिम्पिक पात्र फेरीच्या मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताच्या स्पर्धकांकडून निराशा झाली. 51 किलो गटात दीपक भोरिया आणि 92 किलोवरील गटात नरेंदर बेरवाल यांचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले. भारताच्या या दोन स्पर्धकांना प्रतिस्पर्ध्यांकडून पहिल्याच फेरीत हार पत्करावी लागली.
पुरूषांच्या 51 किला वजन गटातील पहिल्या फेरीतील सामन्यात अझर बेजानच्या निजातने भारताच्या दीपक भोरियाचा 3-2 अशा गुण फरकाने पराभव केला. भोरियाने यापूर्वी विश्व मुष्टियुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेत कांस्यपदक मिळविले होते. तर 92 किलोवरील वजन गटात पहिल्या फेरीतील सामन्यात जर्मनीच्या टायफेकने भारताच्या नरेंदर बेरवालचा 5-0 अशा गुण फरकाने एकतर्फी पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. येत्या जुलै-ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील पात्रतेसाठी कोटा पद्धतीनुसार इटलीतील स्पर्धेत स्थान मिळविता न आलेल्या मुष्टियोद्ध्यांना आणखी एक शेवटची संधी येत्या मे महिन्यात उपलब्ध करुन दिली जाणार आहे. बँकॉकमध्ये 23 मे ते 3 जून दरम्यान पॅरिस ऑलिम्पिकसाठी दुसरी विश्व ऑलिम्पिक पात्र फेरीची मुष्टियुद्ध स्पर्धा घेतली जाणार आहे.
या स्पर्धेसाठी काढण्यात आलेल्या ड्रॉमध्ये भारतीय स्पर्धकांना कडवे प्रतिस्पर्धी लाभले आहेत. त्यामुळे त्यांचा ड्रॉ खूपच कठिण असल्याचे दिसून येते. विश्व मुष्टियुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेत कांस्यपदक मिळविणारा भारताचा मोहम्मद हुसामुद्दीन याला इटलीतील स्पर्धेत पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली आहे. तर 63 किलो गटात भारताच्या शिवा थापाला पहिल्याच फेरीत विद्यमान विश्व विजेता उझबेकचा अब्दुलेव्हशी लढत द्यावी लागणार आहे. 71 किलो गटात निशांत देवचा सलामीचा सामना ब्रिटनच्या लेव्हिस रिचर्डसनशी होणार आहे. 80 किलो गटात लक्ष्य चहरचा पहिल्या फेरीतील सामना इराणच्या मेसाम घेसलेगीशी होणार आहे. 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी आतापर्यंत भारताच्या चार मुष्टियोद्ध्यांनी आपले तिकीट निश्चित केले आहे. 50 किलो गटात निखत झरीन, 54 किलो गटात प्रिती पवार, 57 किलो गटात परवीन हुडा आणि 75 किलो गटात लवलिना बोर्गोहेन यांनी आपली पात्रता सिद्ध केली आहे. गेल्या वर्षी झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील कामगिरीनंतर भारताच्या या चार मुष्टियोद्ध्यांचा पॅरिस ऑलिम्पिकचा मार्ग मोकळा झाला आहे.