भारतापुढे दक्षिण आफ्रिकेशी बरोबरी साधण्याचे आव्हान
दुसरी कसोटी आजपासून, गोलंदाजांबरोबर फलंदाजांचीही लागणार कसोटी
वृत्तसंस्था/ केपटाऊन
भारताची दक्षिण आफ्रिकेविरुद्धची दुसरी कसोटी आज बुधवारपासून सुरू होत असून यजमानांविरुद्ध मालिकेत बरोबरी साधण्यासाठी आणि जागतिक कसोटी स्पर्धेच्या गुणतालिकेत परिणामकारक राहण्यासाठी कर्णधार रोहित शर्माला त्याच्यातील विजेत्या रणनीतीकाराचे गुण दाखवावे लागतील.
भारताचा सर्व प्रकारांतील मौल्यवान खेळाडू रवींद्र जडेजा संघात परतणार असून त्यामुळे फलंदाजीतील मधल्या फळीला संतुलन प्राप्त होईल तसेच जुन्या कुकाबुरा चेंडूने काही षटके मारा करण्यासाठी एका फिरकी गोलंदाजाचा पर्यायही प्राप्त होईल. परंतु तिसऱ्या आणि चौथ्या वेगवान गोलंदाजाच्या जागेवर कुणाची निवड होते त्यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे. रोहितला हे चांगलेच माहीत असेल की, कसोटी क्रिकेटसाठी प्रसिद्ध कृष्णा अजून उपयुक्त बनलेला नाही आणि शार्दुल ठाकूरची प्रतिभाही त्याला सामना जिंकून देण्याकामी फारशी उपयोगी पडणार नाही.
पण वरच्या फळीतील तीन फलंदाज यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांना उसळत्या चेंडूंचा सामना करताना ज्या समस्या भेडसावल्या आहेत त्याने संघाची चिंता वाढवली आहे. अशा परिस्थितीत शार्दुलची उपस्थिती फलंदाजीला काही प्रमाणात बळकटी देईल असे संघाला वाटू शकते. पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात के. एल. राहुल आणि दुसऱ्या डावात विराट कोहलीचा अपवाद वगळता सेंच्युरियन येथे एकाही भारतीय फलंदाजाला अतिरिक्त उसळी आणि स्वींग होणाऱ्या चेंडूंचा नीट सामना करता आला नाही.
नवीन जागतिक कसोटी स्पर्धेतील तीन कसोटी सामन्यांमध्ये एक पराभव आणि एक बरोबरी स्वीकारावी लागल्याने भारत या सामन्यात विजय नोंदविण्यास उत्सुक असेल. पण हे सोपे नाही, कारण येथे भारताने मागील सहा सामन्यांपैकी चार गमावले आहेत. 2023 चे शेवटचे सहा आठवडे रोहितसाठी फारसे चांगले राहिलेले नसून तो अजूनही भारताच्या विश्वचषक स्पर्धेतील अंतिम फेरीतील पराभवातून सावरण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येते. त्यात सेंच्युरियनमध्ये अडीच दिवसांत पराभव स्वीकारावा लागल्याने भर पडली आहे. भारताच्या एक डाव आणि 32 धावांच्या पराभवात त्यांचे फलंदाज आणि गोलंदाज तांत्रिकदृष्ट्या उघडे पडलेच, त्याशिवाय कर्णधाराचेही कौशल्यही उघडे पडले.
2024 ची सुऊवात धूमधडाक्यात करण्याच्या दृष्टीने न्यूलँड्सच्या मैदानावर विजय मिळवण्यापेक्षा दुसरा चांगला मार्ग असू शकत नाही. पण या मैदानावर भारताविऊद्ध दक्षिण आफ्रिकेचा वरचष्मा राहिला आहे आणि आपल्या शेवटच्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे कर्णधारपद भूषवणाऱ्या डीन एल्गरला रोहित शर्मा हा दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिका किमान बरोबरीत साडविणारा महेंद्रसिंह धोनीनंतरचा दुसरा कर्णधार बनलेला पाहणे मुळीच आवडणार नाही. 33 ते 34 अंश तापमान राहणाऱ्या न्यूलँड्स येथे नाणेफेक महत्त्वपूर्ण असेल आणि चांगले गवत असले, तरी खेळपट्टी फलंदाजांचे नंदनवन राहण्याची आणि फिरकी गोलंदाजांना फारशी मदत न करण्याची शक्यता आहे.
त्यामुळे जडेजा तंदुऊस्त झाल्याने आणि निवडीसाठी उपलब्ध असल्याने रविचंद्रन अश्विनला कायम ठेवणे शहाणपणाचे ठरणार नाही. तथापि, तज्ञ फलंदाजांवर अवलंबून राहून शार्दुल आणि प्रसिद्धच्या जागी मुकेश कुमार आणि आवेश खान यांना संघात घ्यायचे की नाही हा मोठा निर्णय रोहितला घ्यावा लागेल. मुकेश कुमार हा शार्दुलच्या तुलनेत नक्कीच अधिक प्रभावी आहे, तर आवेश हा चेंढडू उसळवू शकतो. पण सामना जसजसा पुढे सरकेल तसतशी खेळपट्टी फलंदाजीसाठी अधिक चांगली होत जाऊ शकते. अशा खेळपट्टीवर डीन एल्गर, एडन मार्करम, टोनी डी झोर्झी, कीगन पीटरसन आणि डेव्हिड बेडिंगहॅम यांचा समावेश असलेली फलंदाजांची फळी प्रभावी ठरेल. त्यामुळे नवीन चेंडूची षटके महत्त्वाची ठरतील. ज्
गोलंदाजांनी जशी चांगली कामगिरी करून दाखविण्याची गरज आहे त्याचप्रमाणे रोहितने कर्णधाराबरोबर फलंदाज म्हणूनही प्रभाव पाडणे आवश्यक आहे. कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी यांचे आव्हान भारतीय फलंदाजांना सोपे जाणार नाही. त्याशिवाय डावखुऱ्या गोलंदाजांविरुद्धचे भारतीय फलंदाजांचे जुने दुखणे पुन्हा उपस्थित करायला तऊण नांद्रे बर्गर देखील सोबत असेल.
संघ : भारत-रोहित शर्मा (कर्णधार), यशश्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, रविचंद्रन अश्विन, कोना भारत, अभिमन्यू ईश्वरन, मुकेश कुमार.
दक्षिण आफ्रिका-डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्करम, टोनी डी झोर्झी, कीगन पीटरसन, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन, मार्को जॅनसेन, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी, नांद्रे बर्गर, केशव महाराज, विआन मुल्डर, झुबेर हमजा, ट्रिस्टन स्टब्स.
सामन्याची वेळ : सकाळी 1.30 वा.