For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऊस आंदोलनाचा भडका; जिल्ह्यात अनेक ठिकाणी चक्काजाम

12:58 PM Nov 19, 2023 IST | Kalyani Amanagi
ऊस आंदोलनाचा भडका  जिल्ह्यात अनेक ठिकाणी चक्काजाम
Advertisement

मागील हंगामातील तुटलेल्या उसाचा दुसरा हप्ता ४०० रूपये व यंदाच्या गाळप होणाऱ्या उसाला पहिली उचल ३५०० रूपये द्या या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील संपूर्ण ऊस पट्ट्यामध्ये चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. याचा आढावा पुढीलप्रमाणे

Advertisement

उदगाव टोल नाक्या जवळ स्वाभिमानीचे चक्काजाम आंदोलन
मागील वर्षाच्या तुटलेल्या उसाचा दुसरा हप्ता प्रति 400/- रुपये व या वर्षीच्या गाळपणाऱ्या उसाची पहिली उचल रुपये 3500/- द्यावी या मागणीसाठी, सरकारला जाग यावे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना वतीने उदगाव तालुका शिरोळ येथील टोल नाक्याजवळ शिरोळ तालुक्याच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. याचे नेतृत्व जिल्हा परिषदचे माजी बांधकाम सभापती स्वाभिमानीचे नेते सावकार मादनाईक यांनी केले. जवळपास एक तास चाललेल्या या आंदोलनामुळे सांगली कोल्हापूर राज्य महामार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. साखर सम्राट यांना तसेच सरकारला जाग आणण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले असून सर्वसामान्यांना त्रास देण्यासाठी नसून त्यामुळे माजी खासदार राजू शेट्टी यांचा पुढील आदेश येईपर्यंत चक्काजाम आंदोलन तात्पुरती स्थगिती दिल्याचे सावकार मादनाईक यांनी बोलताना सांगितले.या आंदोलनामध्ये अंकुश आंदोलन, तसेच इतर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता. आंदोलन स्थळी जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री कोळेकर यांच्यासह पोलिसांचा फौज फाटा तैनात होता. आंदोलनानंतर जवळपास अर्धा तास नंतर वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना यश आले.

सरवडे येथे कडकडीत बंद, बसस्थानकावर चक्का जाम

Advertisement

गत वर्षीच्या गळीत झालेल्या ऊसाला प्रतिटन ४०० रुपयांचा दुसरा हप्ता व चालू हंगामातील ऊसाला प्रतिटन ३५०० रुपयांचा पहिला हप्ता द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनास सरवडे येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आज संपूर्ण व्यापारी पेठ बंद ठेवून आंदोलनास पाठिंबा दिला तर संघटना कार्यकर्ते व शेतकरी यांनी निपाणी - राधानगरी राज्य मार्गावर रास्ता रोको करुन संपूर्ण वाहतूक रोखली.
यावेळी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राधानगरी तालुका अध्यक्ष प्रा.पांडुरंग जरग म्हणाले, शेतकऱ्याच्या कष्टाला दाम मिळाले पाहिजे यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांनी हा लढा सुरू केला असून शेतकऱ्यांनी या लढ्याला चांगला प्रतिसाद दिला आहे. यावेळी आंदोलनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बिद्री- मुदाळतिट्टा येथे मुख्य रस्त्यावर शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन
मागील हंगामातील तुटलेल्या उसाचा दुसरा हप्ता प्रति टन ४०० रुपये व यंदाच्या गाळप होणाऱ्या उसाला पहिली उचल ३५०० रुपये द्यावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज चक्का जाम आंदोलन पुकारण्यात आले.या चक्काजाम आंदोलनाला पाठिंबा म्हणून बिद्री ( ता. कागल ) येथील गारगोटी-कोल्हापूर मुख्य राज्यमार्गावर व कागल, राधानगरी व भुदरगडचे प्रवेशद्वार असलेल्या मुधाळतिट्टा येथे ठिय्या मांडून आंदोलन केले. त्यामुळे चारही मार्गावर वाहनांच्या लांबवर रांगा लागल्याने सुमारे तासभर वाहतूक विस्कळीत झाली होती.
यावेळी शेतकऱ्यांनी ऊस दर आमच्या हक्काचा ; नाही कुणाच्या बापाचा, या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय ; मागील गळीताचे ४०० रुपये मिळालेच पाहिजेत ; यंदा ३५०० रुपये पहिली उचल मिळालीच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या ठिकाणी मुरगुड पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

हुपरी येथे चक्का जाम; शेतकरी संघटनेचे आंदोलन
गत वर्षीच्या गळीत झालेल्या ऊसाला प्रतिटन४०० रुपयांचा दुसरा हप्ता व चालू हंगामातील ऊसाला प्रतिटन ३५०० रुपयांचा पहिला हप्ता द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनास हुपरी व परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान शहरातील व गावागावातील उद्योजक, व्यापारी, नागरिक यांनी आंदोलनास पाठिंबा दिला तर स्वाभिमानी शेतकरी कार्यकर्ते व शेतकरी यांनी हुपरी कोल्हापूर मेन रस्ता जुने बस स्थानकावर रास्ता रोको करुन संपूर्ण वाहतूक रोखली.
यावेळी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हातकणंगले तालुका अध्यक्ष राजाराम देसाई म्हणाले, शेतकऱ्यांच्या कष्टाला दाम मिळाले पाहिजे आणि दुसरा हप्ता४००रुपये मिळाला पाहिजे यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांनी हा लढा सुरू केला असून शेतकऱ्यांनी या लढ्याला चांगला प्रतिसाद दिला आहे. संघटनेची मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन चालूच राहणार असून त्याला सर्वानी सहकार्य करावे असे ते म्हणाले. यावेळी पोलीस निरीक्षक किशोर शिंदे ,पोलीस उपनिरीक्षक प्रसाद कोळपे यांच्यासह पोलीस बंदोबस्त सज्ज होता.

हातकणंगलेत स्वाभिमानीचे चक्का जाम आंदोलन

मागील गळीत हंगामातील ऊसाला ४०० रुपये व चालु गळीत हंगामातील उसाला प्रतिटन ३५०० रुपये हप्ता देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोल्हापुर -सांगली मार्गावर चक्काजाम आंदोलन केले. चक्काजाम तब्बल चाळीस मिनिटे केले.
चक्काजाममुळे जयसिंगपूर , शिरोली व वडगांव मार्गावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलनस्थळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देवुन परिसर दणाणुन सोडला. यावेळी खास. राजु शेट्टी यांनी मंगळवारी दि २१ रोजी कारखानदार, स्वाभिमानी शेतकरी संघटना व प्रशासन यांच्यामध्ये समन्वय बैठक होणार आहे. बैठकीत समन्वयाने तोडगा निघाला नाही तर रविवारी २६ रोजी पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखणार असल्याचा इशारा दिला.

दुसरा हप्ता मिळाल्याशिवाय ऊस तोडी न घेण्याचा निर्धार करावा : स्वाभिमानीचे कोडोलीत चक्का जाम आंदोलनात आवाहन
गतवर्षीच्या गाळप झालेल्या ऊसाचा दुसरा हप्ता ४०० रुपये द्यावा तो मिळेपर्यन्त शेतकऱ्यांनी ऊसतोडणी न घेण्याचा निर्धार करावा असे आवाहन स्वाभिमानीच्या चक्का जाम आंदोलन प्रसंगी स्वाभिमानीचे पन्हाळा तालुका अध्यक्ष अजित पाटील यानी केले.
कोडोली ता. पन्हाळा येथील राज्य मार्गावरील एमएसईबी फाट्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत चक्का जाम आंदोलन करण्यात आलेने दळण वळण ठप्प झाले होते. पर्यायी मार्गाने वहातुक सुरु ठेवण्यात देखील अडथळे निर्माण झाले होते एवढ्या मोठ्या लांब पर्यन्त वाहनांच्या रांगा दुतर्फा लागल्या होत्या या मुख्य मार्गावरील चक्का जाम मुळे साखर कारखाना गळीत हंगामावर मोठा परिणाम झाला आहे.

पन्हाळा तालुक्यात दत्त दालमिया शुगर आसुर्ले, वारणा साखर कारखाना या गळीत हंगाम सुरू झालेल्या कारखान्याच्या गाळपावर आंदोलनामुळे कमी प्रमाणात गाळप होऊ लागले आहे . याचा शाहूवाडी,पन्हाळा,हातकणंगले, वाळवा,शिराळा तालुक्यातील ग्रामीण भागातील वारणा परिसरात दुसऱ्यां हप्त्यासाठी ४०० रुपये व चालू गळीत हंगामातील ऊसास ३५०० रुपये प्रतिटन दर देण्यात यावा यासाठी ऊस तोडी बंद होऊ लागल्या आहेत.

कबनूर मध्ये चक्काजाम आंदोलन
गत हंगामातील दुसरा हप्ता चारशे रुपये व चालू गळीत हंगामातील पहिली उचल तीन हजार पाचशे मिळावेत या मागणीसाठी आज कबनूर येथील मुख्य चौकात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या कष्टाला दाम मिळावे याकरिता विविध रूपाने आंदोलने चालू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कारखानदारांना प्रशासनाला जागे करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चक्का जाम आंदोलन पुकारण्यात आले आहे. त्या अनुषंगाने रविवारी सकाळी दहा वाजता कबनूर येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार मुख्य चौकात चक्काजाम आंदोलन केले. स्वागत व प्रास्ताविक महावीर लिगाडे यांनी केले. यावेळी मिलिंद कोले, धुळगौंडा पाटील यांच्यासह मान्यवरांची भाषणे झाली. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी मिलिंद कोले, धुळगौंडा पाटील, महादेव पाटील, सुकुमार चव्हाण जलगोंडा पाटील सौरभ कोले विजय पाटील सुधीर चौगुले संजय खुरपे सुहास उपाध्ये सुनील वडगावे संजय अबदान अण्णा पाटील महावीर ऐनापुरे या प्रमुखासह कबनूर चंदूर रुई कोरोची साजणी तिळवणी व तारदाळ मधील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार अभय बलवान यांनी मानले.

मुरगुडात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा चक्काजाम

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चक्काजाम आंदोलनात मुरगुड मधील शेतकऱ्यांनी राधानगरी- निपाणी रस्त्यावर ठिय्या मारून सर्व वाहतुक रोखली. राधानगरी- निपाणी रस्त्यावर सकाळी ९ वा.च्या सुमारास शेतकऱ्यांनी बैठक मारली. त्यामुळे दोन्ही बाजूनी येणारी सर्व प्रकारची वाहतूक ठप्प होऊन बराच काळ वाहने रेंगाळली. यावेळी समाधान हेंदळकर यांनी स्वागत केले. मारुती चौगले, नामदेव भराडे जोतीराम सूर्यवंशी- पाटील, संदीप भारमल नामदेवराव मेंडके, दत्तात्रय मंडलिक, बाणगे सरपंच रमेश सावंत,सुरेश साळोखे, कृष्णात सोनाळे (मळगे), दत्तात्रय आरडे आदीनी मनोगते मांडली.या आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होते. यावेळी आंदोलनकर्त्यानी मागील वर्षीचे प्रति टन येणे बाकी ४०० रु. आणि यावर्षी टनाला ३५०० रुपये भाव मिळालाच पाहिजे या मागणीवर जोर धरला. 'ऊस खाल्ला कोल्ह्यानी, साखर खाल्ली चोरांनी!' अशा घोषणा देत साखर कारखाना निवडणूकांच्या आघाड्या दोन-आडीच तासात होतात. शेतकऱ्यांच्या मागणीवर मात्र दोन -अडीच महिने का लागतात ?असा सवाल यावेळी करण्यात आला.

बिद्रीचे उमेदवार आंदोलनात सहभागी
बिद्रीच्या पंचवार्षिक निवडणुकीतील राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीचे गट क्रमांक ४ मधील तिन्ही उमेदवार रणजीतसिंह पाटील, जयवंत पाटील आणि शेखर सावंत यांनी आंदोलन स्थळी येऊन शेतकऱ्यांबरोबर रस्त्यावर ठिय्या मारला. रणजीतसिंह पाटील बोलायला उठले असताना एका आंदोलनकर्त्याने 'उमेदवारांनी अगोदर ऊस दराचा जाहीरनामा घोषित करावा असा आग्रह धरला तर आणखी एकाने 'शाहू'च्या चेअरमननी ३५०० रु. दराची घोषणा करून कोंडी फोडण्याची मागणी केली.

कोल्हापूर- गगनबावडा राष्ट्रीय महामार्गावर सांगरुळ फाटा कोपार्डे येथे चक्काजाम आंदोलन

गतवर्षीच्या ऊसाला प्रतिटन ४०० रुपये आणि या वर्षीच्या गळीत हंगामातील उसाला प्रतिटन ३५०० रुपये द्यावेत या मागणीसाठी राज्यातील सर्व शेतकरी संघटना एकत्र आल्या असून उसाला ५१०० रुपये दर देणे शक्य आहे, मात्र साखर कारखानदार ऊस दर देण्यासाठी बांधील नाहीत असे प्रतिपादन शरद जोशी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव पाटील (साबळेवाडीकर) यांनी केले. सांगरूळ फाटा, कोपार्डे (ता. करवीर) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आयोजित केलेल्या चक्काजाम आंदोलनात पाटील बोलत होते.
यावेळी सर्व शेतकरी संघटनांच्या वतीने कोल्हापूर- गगनबावडा राष्ट्रीय महामार्ग काही काळ अडवण्यात आला. त्यावेळी दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कुंभी कासारी परिसर अध्यक्ष बाजीराव देवाळकर यांनी शेतकऱ्यांनी दोन दिवस थांबावे, नक्कीच कारखानदार ऊस दर देतील असे सांगून राजू शेट्टी यांच्या आदेशाप्रमाणे पुढील आंदोलन हातात घेण्यात येणार असल्याचे सांगितले.रामदास पाटील (दोनवडे) यांनी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी ऊस दरावर तोडगा काढावा अशी मागणी केली.यावेळी "ऊस आमच्या घामाचा, नाही कोणाच्या बापाचा" अशा घोषणा देण्यात आल्या. या चक्काजाम आंदोलनामुळे काही काळ कोल्हापूर- गगनबावडा राष्ट्रीय रस्ते महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. करवीरचे पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुहास पोवार, विजय तळसकर यांच्यासह चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

करवीर पोलिसांनी कोल्हापूर- गगनबावडा राष्ट्रीय महामार्ग असल्याने चक्काजाम आंदोलन लवकर संपवावे असे सुचवले,त्याला संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फारसी हरकत घेतली नाही, त्यामुळे अवघ्या १५ मिनिटात चक्काजाम आंदोलन समाप्त झाले.

बीडशेड येथे शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खास. राजू शेट्टी यांनी पुकारलेल्या चक्काजाम आंदोलनासमर्थनात बीडशेड येथे ऊसाला दर मिळावा यासाठी चक्काजाम करण्यात आला.बीडशेड येथील चौकात सकाळी ९ वाजलेपासून कसबा बीड, सावरवाडी, गणेशवाडी, बहिरेश्वर, शिरोली दुमाला यासह करवीरच्या पश्चिम परिसरातील गावातील शेतकरी एकत्र येण्यास सुरुवात झाली. तासभर चाललेल्या या आंदोलनात उसाला ३५०० दर व मागील ४०० रुपये मिळालेच पाहिजे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा, राजू शेट्टींचा विजय असो, मिळालीच पाहिजे.. ऊस दरवाढ मिळालीच पाहिजे आदी घोषणानी परिसर दणानून सोडला.
सर्व शेतकऱ्यांनी १ तास चक्काजाम आंदोलन केले.त्यामुळे रस्त्याच्या चारही बाजूला दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
यावेळी राजेंद्र सूर्यवंशी, हे आंदोलन शांततेत सुरू आहे, त्यामुळे दमदाटी करून उसाची वाहतूक करू नका. पुढचे पाऊल उचलायला लावू नका. जे कोणी ऊस वाहतूक करतील ते शेतकरीविरोधी असल्याचे समजले जाईल. वाढलेल्या साखर दराचा मोबदला शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. असे कॉ.डी.एम.सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले.

Advertisement
Tags :

.