‘चांगभलं’च्या गजरात चैत्र यात्रा
प्रतिनिधी/ कोल्हापूर
‘चांगभलं रं देवा चांगभलं...’, ‘जय जय जोतिबा केदारा..’चा अखंड जयघोष, गुलाल, खोबरे, दवणाची उधळण, पारंपरिक वाद्यांचा ठेका, गगनचुंबी सासनकाठ्या आणि बा जोतिबाच्या भक्तीरसात लीन झालेले लाखो भाविक अशी चैतन्यमय वातावरणात शनिवारी श्री क्षेत्र वाडी रत्नागिरीवरील जोतिबा देवाची चैत्र यात्रा अमाप उत्साहात पार पडली.
दख्खनचा राजा जोतिबाच्या चैत्र यात्रेला महाराष्ट्रासह परराज्यातील भाविकांनी दोन दिवसापासून डोंगरावर हजेरी लावली होती. शनिवारी यात्रेच्या मुख्य दिवशी लाखो भाविक जोतिबा चरणी लीन झाले. यावेळी भाविकांच्या चेहऱ्यावरील उत्साह ओसंडून वाहत होता. गुलाल, खोबऱ्याच्या उधळणीसह गगनचुंबी सासनकाठ्यांनी सारा आसमंत फुलला होता.
शनिवारी पहाटे पाच वाजता शासकीय अभिषेक झाला. दुपारी 12 वाजता यात्रेनिमित्त पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी जोतिबाची विधिवत पूजा केली. त्यांच्या हस्ते सातारा जिह्यातील निनाम पाडळी येथील सासन काठी क्र. 1 या मानाच्या सासनकाठीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मौजे विहे (ता. पाटण), नंतर करवीर कोल्हापूरची हिंमत बहादूर चव्हाण, कोल्हापूर छत्रपती, कसबा डिग्रज (ता. मिरज), कसबा सांगाव (ता. कागल), किवळ (जि. सातारा), कवठेएकंद (जि. सांगली) यांच्यासह मानाच्या एकूण 108 सासनकाठ्या सहभागी झाल्या. यावेळी पर्यटनमंत्री शंभूराज देसाई, आमदार सतेज पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार माधवी शिंदे, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, अंबाबई मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे, जोतिबा मंदिर व्यवस्थापक धैर्यशील तिवले आदी उपस्थित होते.
राज्य आनंदी आणि आरोग्यसंपन्न होवो : पालकमंत्री प्रकाश आबिटकर
राज्यातील प्रत्येक माणसाच्या जीवनात आनंद आणि उत्साहाचे क्षण यावेत. सर्व नागरिकांना आरोग्यसंपन्न, सुखी व आनंदी राहू दे. राज्याच्या सर्वांगीण विकासासह वेगवान प्रगतीसाठी दख्खनचा राजा श्री जोतिबाकडे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी साकडे घातले. श्रद्धेसह दर्शनासाठी आलेल्या लाखो भाविकांच्या मनोकामना पूर्ण होवोत अशी प्रार्थना त्यांनी जोतिबा चरणी केली.
विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा जोतिबा आराखडा : पालकमंत्री आबिटकर
दख्खनचा राजा जोतिबाचे महत्त्व आणि श्रद्धा राज्यासह देशातील भाविकांच्या मनात आहे. येथे येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी शासनाच्यावतीने एक चांगला जोतिबा प्राधिकरण विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी शाहूवाडीचे आमदार विनय कोरे यांनी पुढाकार घेतला आहे. येथील नागरिक, प्रशासनासह सर्वांना सोबत घेऊन हा आराखडा तयार केला जात आहे. सर्वांचा विचार, सोयी, परिसरातील चांगला विकास होण्याच्या दृष्टीने आराखडा केला जात आहे. या आराखड्याला विकासाच्या दृष्टीने महत्त्व आहे.
भाविकांची मनोभावे सेवा
यात्रेसाठी डोंगरावर आलेल्या भाविकांना जिल्हा प्रशासन, जिल्हा आरोग्य विभाग, सामाजिक संस्था-संघटना, देवस्थान समिती, खासगी रुग्णालयांमार्फत मोफत वैद्यकीय उपचारांची व्यवस्था करण्यात आली होती. जिल्हा प्रशासनाच्या नियोजनामुळे पोलीस बंदोबस्तामुळे यात्रा सुरळीत पार पडली. तसेच यात्रामार्गावर ठिकठिकाणी महाप्रसाद, अन्नछत्राद्वारे भोजन, चहा, नाष्टा, सरबत, पाणी वाटपाचे उपक्रम राबवण्यात आल्याचे चित्र पहायला मिळाले.
गुलालात न्हाला जोतिबा डोंगर
राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांच्या जनसागराने जोतिबा डोंगर फुलला होता. भाविकांनी केलेल्या गुलालाच्या उधळणीने डोंगर गुलालात न्हाऊन निघाला होता. उन्हाच्या कडाक्यातही पारंपरिक वाद्यांच्या गजरात भाविकांनी उत्साही वातावरणात सासनकाठ्या नाचविण्याची परंपरा अबाधित ठेवली. यात्रेसाठी लहान-मोठ्या शेकडो मानाच्या सासनकाठ्यांसह अबालवृद्ध सहभागी झाले होते. श्री जोतिबाच्या दर्शनाने तृप्त होऊन परतीचा प्रवास करताना भाविकांच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहत होता.
जोतिबाची राजेशाही थाटात पूजा
चैत्र यात्रेनिमित्त जोतिबाची राजेशाही थाटातील आकर्षक पूजा बांधली होती. पगडी परिधान केलेली सिंहासनारूढ दख्खनच्या राजाची पूजा लक्षवेधी होती. पुजारी आंनदा बुने, महादेव गुरव, बाळकृष्ण सांगळे यांनी ही पूजा बांधली होती.
25 हजार कापडी पिशव्यांचे वाटप
यंदा प्लास्टिकमुक्त यात्रेसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे 25 हजारावर कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. परिसरातील सर्व दुकानदारांना प्लास्टिकऐवजी कापडी पिशव्या वापरण्याच्या सूचना दिल्या होत्या.
प्रशासनाचे नेटके नियोजन
अन्न औषध प्रशासनाकडून तपासणी, पार्किंगची 34 ठिकाणी व्यवस्था, विविध ठिकाणी अन्नछत्र, दर्शन रांग व्यवस्था, सुरक्षेसाठी सीसीटिव्ही, पोलीस बंदोबस्त, 30 ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे सुविधा, आरोग्य सुविधा, स्वच्छता, लाईव्ह दर्शनाची व्यवस्था केली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली गर्दीच्या ठिकाणांवर विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.